दुष्काळी उपाययोजनांना मुदतवाढ

दुष्काळी उपाययोजनांना मुदतवाढ

टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे.

राज्यातील बहुतांश जिल्हयांमध्ये अद्याप समाधानकारक पावसाने हजेरी न लावल्याने दुष्काळी उपायोजना राबविण्यासाठी राज्य शासनाने १ ऑगस्टपर्यंत मुदवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानूसार टँकरसह पाणीपूरवठा योजना ३० जूननंतरही सुरू ठेवण्याचे अधिकार जिल्हाधिकारयांना देण्यात आले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

यंदा जिल्हयातील २४ प्रकल्पांत अवघा पाच टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. शहराला पाणीपूरवठा करणारया गंगापूर धरणसाठयाच्या पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाल्याने शहरातही एक वेळ पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हयात गेल्या दोन तीन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली असली तरी, दिंडोरी, त्रयंबकेश्वर, नांदगाव, मालेगाव, देवळा, येवला या तालुक्यांना अद्यापही पावसाची प्रतिक्षा आहे. जिल्हयात आजअखेर ४०० टँकरने पाणीपूरवठा करण्यात येत आहे. अद्यापही ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची परिस्थिती भयावह आहे. अशा स्थितीत ३० जून ही टँकर सुरू ठेवण्याची मुदतही संपुष्टात आल्याने टँकर बंद होण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती मात्र शासनाने त्यास मुदतवाढ दिली आहे. त्यानूसार दुष्काळी उपायोजनांअंतर्गत घेण्यात येणारया तात्पुरत्या योजना, विशेष नळ दुरूस्ती योजनांना चालू मुल्यांकन किमतीपेक्षा १० टक्के जादा दराच्या निविदा स्विकृतीचे अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारयांना दिले आहेत ते १५ जूलैपर्यंत लागू राहतील. १९ डिसेंबर २०१८ च्या निर्णयाने टंचाई उपाययोजनांची काम सुरू ठेवण्याची तरतूदही १५ जुलैपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी शासनाने दिली आहे.

अवघ्या एक टक्के क्षेत्रावर पेरणी

गतवर्षी जूनअखेर ३० हजार हेक्टरवर खरीप पेरण्या झाल्या होत्या. यंदा जेमतेम एक हजार ५०० हेक्टरवर खरीप पेरण्या झाल्या आहेत. जिल्हयात ५ लाख ९४ हजार हेक्टर खरीप क्षेत्र असलेल्या जिल्हयात पेरण्यांची टक्केवारी अवघी एक टक्के आहे.

३ जुलैली मुसळधार?

हवामान विभागाने ३ जुलै रोजी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. रविवारी जिल्हयात ठिकठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाउस झाला. धरण भरण्यासाठी अजून दमदार पावसाची प्रतिक्षा आहे. खरीपाच्या पेरण्यांसाठी पावसाची मदत होत असली तरी धरणे भरण्यासाठी हा पाउस पुरेसा नाही मात्र ३ जूलैपासून दमदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

First Published on: July 1, 2019 8:15 AM
Exit mobile version