दिंडोरीत बनावट सॅनिटायझरचा साठा जप्त

दिंडोरीत  बनावट सॅनिटायझरचा साठा जप्त

महाराष्ट्र पोलीस

दिंडोरी तालुक्यातील जऊळके दिंडोरी परिसरात असलेल्या संचेती वेअर हाऊसवर दिंडोरी पोलिसांनी छापा टाकून  अवैध व अप्रमाणित सॅनिटायझरचा सुमारे आठ लाखाचा साठा  जप्त  केला. शासनाने सुरू केलेल्या या कारवाईमुळे अवैध साठमारी करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

पुरवठा निरीक्षक रविंद्र निर्भवणे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, जऊळके दिंडोरी शिवारातील नवीन संचेती वेअर हाऊस मधील मारुती इंटेस्टीज कंपनीत पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांच्या नेतृत्वाखाली दिंडोरी पोलिसांनी छापा मारला.  कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीररित्या सॅनिटायझर चा सुमारे आठ लाखाचा साठा आढळून आला. त्यात पॅटसन सॅनिटायझर च्या 100 मिली च्या सुमारे 5760 बाटल्या त्यात 3360 बाटल्यांवर बॅच उत्पादन तारीख एक्सपायरी तारीख किंमत देखील छापलेले  आढळले नाही. त्याचप्रमाणे 200 लिटरच्या दोन टाकीत सॅनिटायझर रसायन तपासणीत दिसून आले. तालुक्यातील प्रतिष्ठित कारखान्यातून हा माल येथे अवैध रित्या साठविण्यासाठी आणला गेला होता. तहसील कार्यालयाच्या आदेशाने झालेल्या या कारवाईमुळे जिल्ह्याभरात खळबळ उडाली आहे. दिंडोरीचे पुरवठा अधिकारी रवींद्र निरभवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदर बेकायदा सॅनिटायझर प्रकरणी अमित अलिम चंदांनी रा नवीन सिडको नाशिक याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत 792600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला . दिंडोरी पोलिसांनीच्या कारवाईचे जिल्हाभर कौतुक होत आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आव्हाड, दिलीप पगार, शंकर जाधव आदी करत आहेत.

First Published on: March 25, 2020 3:13 PM
Exit mobile version