कोविड मृतांच्या कुटुंबियांना बँक खात्यावरच मदत

कोविड मृतांच्या कुटुंबियांना बँक खात्यावरच मदत

 नाशिक : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला ५० हजार रुपयांची भरपाई मिळणार आहे. केंद्र सरकारच्या या योजनेला सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन राबविण्यात येणार असून यासाठी शासनामार्फत पोर्टल विकसित केले जात आहे. कोरोना मृतांची सर्व माहिती प्रशासनाकडे उपलब्ध असून नागरिकांनी ऑफलाईन अर्ज करण्याची गरज नाही.

कोरोना मृतांच्या कुटुंबियांना शासनामार्फत देण्यात येणारी ५० हजार रुपयांची मदत मिळवून देण्याबाबत काही एजंट नागरिकांकडून एक हजार रुपये उकळत आहेत. नागरिकही त्यांच्या भुलथापांना बळी पडत असून संधीचा फायदा घेत काही लोक नागरिकांची लूट करत आहेत. मात्र, मदतनिधी देण्याची संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीनेच केली जाणार आहे. कोरोना मृतांबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध आहे. यासाठी शासनाकडून पोर्टल विकसित करण्यात येत असून याबाबत मार्गदर्शन तत्वे जारी होताच प्रशासनामार्फत मृत रुग्णांबाबत माहिती या पोर्टलवर अपलोड केली जाणार असून ही मदत मृतांच्या वारसांना किंवा कुटुंबियांना बँक खात्यावरच दिली जाणार आहे.

मृत्यू प्रमाणपत्रावर मृत्यूचे कारण कोविडमुळे असे नमूद केलेले नसेल तर डॉक्टरांच्या प्रमाणपत्राच्या आधारेही संबंधित कुटुंब मदत मिळविण्यासाठी पात्र असेल. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन होणार असून याबाबत आयुक्त, जिल्हाधिकारी यांना मॅन्युअली तयारी पूर्ण करून ठेवण्याबाबत निर्देश दिले आहेत.

                                  – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

First Published on: October 20, 2021 7:51 PM
Exit mobile version