घर, संसार घेऊन लढते आहे..

घर, संसार घेऊन लढते आहे..

हताश बसलेले वकटे कुटुंब

ज्ञानेश उगले

घर गेले दार गेले, नुस्ता नुस्ता नुस्ता वारा..
कोण वेडी वेचीत बसली आयुष्याच्या टिचल्या गारा..

..या ओळी जणू वडनेर भैरवच्या सुनीताताई वकटेंसाठीच लिहिलेल्या आहेत. नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून पती कोंडाजी रामभाऊ वकटे यांनी द्राक्षपिकासाठी आणलेलं नुवान हे किडनाशक पिऊन १७ मे २०१६ ला वयाच्या ३६ व्या वर्षी आत्महत्या केली. या घटनेला मे महिन्यात तीन वर्षे पूर्ण होतील. निसर्ग अन व्यवस्थेशी आधीपासूनच असलेला संघर्ष पतीच्या निधनानंतर अधिकच तीव्र होत गेला आहे. भांडवला अभावी दीड एकर द्राक्ष बाग तोडून टाकलीय. पाण्याचा ताण सहन करीत बिगाभर बाग कशीबशी उभी आहे. कर्ज काढून तयार केलेल्या शेततळ्याला अजूनही प्लॅस्टिक कव्हर टाकता आलं नाही. त्यामुळे तळ्यात थेंबभरही पाणी साचले नाही. सासरे रामभाऊ वकटे यांचंही गतवर्षी निधन झाल्यामुळे उरलासुरला आधारही हरपला आहे. घराचा गाडा चालवण्यासाठी सुनिताताईंसह वकटे कुटुंबावर मजुरी करण्याची वेळ आली आहे.

संकटांनी उद्ध्वस्त केले

नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुका अशी चांदवडची ओळख आहे. या तालुक्यातील वडनेर भैरव हे गाव याही प्रतिकूलतेत प्रयोगशील शेतीसाठी प्रसिद्ध आहे. येथील वकटे कुटुंबाकडे एकूण साडे तीन एकर वडिलोपार्जित. या जमिनीत कांदा, सोयाबीन, भुईमूग ही पारंपारिक पिके घेतली जात. २०१५ मध्ये कुटुंब प्रमुख असलेल्या कोंडाजी यांनी ३ एकरावर द्राक्षपीक लागवड करायचं ठरवलं. त्यासाठी गावातील सोसायटीकडून कर्ज घेतलं. उन्हाळ्यात पाण्याची कमतरता जास्तच भासत असताना या दरम्यान त्यांनी हक्काच्या पाण्यासाठी शेततळंही खोदलं. २०१६ मध्ये गारपीटीने पिकांचे नुकसान झाले. यातच सोसायटी व देणेदारांनी कर्जाच्या परतफेडीचा तगादा लावला होता. निराश झालेल्या कोंडाजींनी मे महिन्यात एका रात्री कुटुंबीय घरात झोपले असताना घराबाहेर झोपण्याच्या तयारीत असतानाच पडवीच्या कोपर्‍यात ठेवलेल्या कीडनाशकाची बाटली तोंडाला लावली. काही वेळाने त्यांच्या उलट्यांच्या आवाजाने घरातील सुनिताताई लगबगीने बाहेर आल्या. दवाखान्यात नेईपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती.

घरातील कर्त्या पुरुषाच्या अशा अचानक जाण्याने वकटे कुटुंबियांवर दु:खाचा पहाडच कोसळला. पंचनामे झाल्यानंतर काही दिवसांनी ७० हजाराची सरकारी मदत मिळाली. काही पाहुणे व नातेवाईकांनीही मदत केली. मात्र, झालेली हानी प्रचंड मोठी होती. घर चालवण्यासाठी सुनिताताई, त्यांचे दीर दत्तात्रय, सासू व सासरे यांनी हिंमत धरली. दरम्यानच्या काळात धीर देण्यासाठी राजकीय क्षेत्रातील अनेक पुढारी येऊन कळवळा दाखवून गेले. मात्र, कुणीही ठोस मदत केली नाही. राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेत आधी पैसे भरा अशी अट असल्याने त्याचाही लाभ मिळाला नाही. जिथं रोजचं जगणच अवघड झालंय. घरच्या मीठ मिरचीसाठी दोनशे रुपये मजुरीने एक्स्पोर्ट कंपनीत कामाला जावे लागते. तिथं कर्ज फेडण्यासाठी दहा बारा लाख कुठून आणणार, हा सुनिताताईंचा उलट प्रश्न अस्वस्थ करतो.

मुलांना काय राहणार?

पती कोंडाजीच्या आठवणींविषयी बोलतांना सुनीताताईंचा कंठ दाटून आला. त्या म्हणाल्या, भांडवल अन कर्जामुळे ते बर्‍याचदा अस्वस्थ होत. त्यांना धीर देण्यासाठी मी त्यांना जमिनीचा तुकडा विकू अन कर्ज फेडू असं सांगायची. तेव्हा ते म्हणायचे, आपण जमीन विकली तर आपल्या पुढच्या पिढीला काय शिल्लक राहणार? आपलं आयुष्य तर गेलंच निदान मुलांचं तरी चांगलं व्हावं. या मानसिक स्थितीपर्यंत ते पोहोचले होते. कोंडाजी सारखे राज्यातील इतर अनेक शेतकरी याच मानसिकतेतून जात आहेत.

संकटांची मालिका…

First Published on: April 4, 2019 11:33 PM
Exit mobile version