महावितरणविरोधात शेतकऱ्यांचे टॉवरवर चढून आंदोलन

महावितरणविरोधात शेतकऱ्यांचे टॉवरवर चढून आंदोलन

नाशिक : कृषी पंपाचे थकलेली वीजबिले न भरल्याने महावितरण कंपनीने पिंप्री सय्यदसह पाच गावांचा वीज पूरवठा खंडित केल्याने संतप्त शेतकर्‍यांनी वीज कंपनीच्या टॉवरवर चढून आंदोलन केले. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, आमदार अ‍ॅड. राहूल ढिकले, आमदार प्रा.देवयानी फरांदे यांनी याठिकाणी भेट देत शेतकर्‍यांना न्याय मिळावा यासाठी अधिकार्‍यांना धारेवर धरले.

दुपारी साडेतीन वाजता अधिकारी व शेतकर्‍यांत चर्चा होऊन आंदोलन स्थगित करण्यात आले असून सोमवारी (दि.३१) पिंप्री सय्यद येथे बैठकीचे आयोजन केले आहे. द्राक्ष व कांदा पिक तोंडावर आलेले असतांना महावितरण कंपनीने वीज पूरवठा खंडीत केल्याने लाखोंरुपयांचे नुकसान होत आहे. शनिवारी (दि.२९) रात्री पिंप्री सय्यद येथील सब स्टेशन मधून शेतकर्‍यांच्या कृषीपंपांचा वीज पूरवठा खंडीत केल्याने पिंप्री सय्यद, विंचूर गवळी, ओढा, लाखलगाव, शिलापूर या गावातील शेतकर्‍यांनी तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. रविवारी (दि.३०) सकाळी संतप्त शेतकरी व शेतकरी संघटनेच्या वतीने येथील वीज कंपनीच्या टॉवरवर चढून आंदोलन केले.

आमदार सरोज आहिरे बाहेर गावी असतांना उर्जा मंत्री नितीन राऊत यांना माहिती देत योग्य तो निर्णय घेण्यास विनंती केली. ग्रामीण पोलीस अधिक्षक सचीन पाटील, वीज कंपनीचे अधिकारी एस.एस. चौरे, कार्यकारी अधिकारी तपासे, तालुका पोलीस ठाण्याच्या सुरेखा आहिरराव, आदींनी शेतकर्‍यांशी चर्चा केली. दुपारी साडेतीन वाजता अतिरिक्त कार्यकारी अभियंता एस.एस. चौरे यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित केल्याची माहिती संघटनेचे रामनाथ ढिकले व अनिल अनवड यांनी दिली.

शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रामनाथ ढिकले, दत्ता ढिकले, देविदास पाटील, संतू ढिकले, भानूदास ढिकले, बबन ढिकले आदींनी टॉवरवर चढून आंदोलन केले, तर संघटनेचे अनिल धनवट, जिल्हा परिषद सदस्य यशवंत ढिकले, सरपंच मधूकरराव ढिकले, माजी सभापती अनिल ढिकले, तालुका संघाचे चेअरमन भाऊसाहेब ढिकले, अंबादास ढिकले, सुकदेव पवार, नाना जाधव, सुरेश वराडे, राजेश ढिकले, किरण ढिकले, राहूल ढिकले आदी सहभागी झाले.

आजच्या बैठकीत निर्णय

दैनंदीन शेड्यूलप्रमाणे वीज पूरवठा सुरु राहील, सोमवारी (दि. ३१) सकाळी पिंप्री गावात लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ व अधिकारी यांची बैठक बोलावण्यात आली आहे, त्यात जो निर्णय होईल व वरिष्ठांकडून ज्या सूचना येतील त्याप्रमाणे पुढील कार्यवाही होईल, असे महावितरण कंपनीचे अतिरीक्त कार्यकारी अभियंता एस. एस. चौरे यांनी सांगितले.

First Published on: January 31, 2022 8:15 AM
Exit mobile version