शेतकर्‍यांनी भाजीपाला फेकला रस्त्यावर

शेतकर्‍यांनी भाजीपाला फेकला रस्त्यावर

मनमाड : कधी अस्मानी तर कधी सुलतानी असे एक ना अनेक संकट शेतकर्‍यांचा पिच्छा सोडायला तयार नाहीत. दुष्काळ त्यानंतर अतिवृष्टी या संकटातून बळीराजा सावरलेला नसताना आता त्याला उत्पादीत मालाच्या भाव घसरणीला तोंड द्यावे लागत आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या सर्वच भाजीपाल्यांच्या भावात मोठी घसरण झाली असून कोथिंबीर, मेथी, वांगे, कांदे यांचे भाव इतके घसरले काही कि त्यातून वाहतुकीवर केलेला खर्च देखील निघत नसल्याचे पाहून शेतकरी कोथिंबीर, मेथी, वांगे रस्त्याच्या कडेला फेकून देत आहेत. केंद्रापासून राज्य सरकार आणि राजकीय पक्षांची झोप उडविणारा कांदा देखील स्वस्त झाला आहे. काही महिन्यांपूर्वी मोठ्या शहरात शंभरी गाठलेला कांदा ५ रुपये किलोवर आला आहे. किरकोळ बाजारात देखील भाजीपाला स्वस्त झाला असून कष्टाने पिकविलेल्या शेतमालाला मातीमोल भावाने विकण्याची वेळ आल्याचे पाहून बळीराजा हवालदिल झाला आहे तर दुसरीकडे मात्र भाजीपाला स्वस्त झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आवक जास्त तर मागणी कमी अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याने भाव कोसळल्याचे व्यापार्‍यांनी सांगितले.

गेल्या ३ वर्षांनंतर यंदा कांद्याला चांगला भाव मिळत होता. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांसाठी काही प्रमाणात अच्छे दिन आले होते. मात्र कांद्याचे भाव वाढताच गल्लीपासून दिल्लीपर्यंत ओरड झाल्यानंतर वाढत्या किंमतीला आळा बसविण्यासाठी केंद्र सरकारने विविध उपाययोजना केल्या त्यामुळे वाढलेल्या किमतींला लगाम लागला. मात्र आता तर भावात मोठी घसरण सुरू झाली असून काही महिन्यांपूर्वी ज्या कांद्याने मोठ्या शहरात किलोच्या दरात शंभरी गाठली होती त्याच कांद्याला आता कमीतकमी ५ रुपये प्रति किलो भाव मिळत आहे. कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असून आवक जास्त तर मागणी कमी असल्याने भावात घसरण होत असल्याचे व्यापार्‍यांचे म्हणणे आहे. हातात दोन पैसे पडतील या आशेवर शेतकरी शेतमाल घेऊन पहाटेपासून कडाक्याच्या थंडीत बाजार समिती आणि किरकोळ बाजारात घेऊन येतो. दिवसभर उपाशी राहून ओरडून ओरडून भाजीपाला विकतो. मात्र कष्टाने पिकविलेल्या त्याच्या शेतमालाला मातीमोल भाव मिळत आहे.

शेतात सोडली जनावरे

यावर्षी सलग आणि दमदार पाऊस झाला. त्यामुळे नदी-नाले, ओढे यांना अनेकदा पूर आले होते तर छोटे-मोठे बंधारे, धरणे शेततळे तुडुंब भरले असून विहिरींत देखील चांगले पाणी उतरले आहे. पाण्याचा मुबलक साठा असल्याने शेतकर्‍यांनी भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली. त्यामुळे यंदा सर्वच भाजीपाल्याची आवक वाढली आहे. आवक वाढताच भावात मोठी घसरण सुरू झाली असून सर्वात जास्त फटका कोथिंबीर, मेथी, शेपू, पालक या भाज्यांना बसला. कोथिंबीरीची एक जुडी ४ ते ५ रुपये, मेथी, शेपू आणि पालकच्या ३ जुड्या १० रुपयाला देखील कोणी घ्यायला तयार नाही. बाजार समितीत आणि किरकोळ बाजारात वाहनातून भाजीपाला आणल्यानंतर वाहतुकीचा खर्च देखील निघत नसल्याचे पाहून शेतकरी शेतमाल फेकून देत आहे. काही शेतकर्‍यांनी तर शेतात अक्षरशः जनावरे सोडली.

First Published on: December 12, 2022 1:07 PM
Exit mobile version