भाव नसल्याने कांदा फेकला शेतात

भाव नसल्याने कांदा फेकला शेतात

कांदा फेकण्यात आलेले शेत

‘कांद्याचा आज भाव वाढेल, उद्या वाढेल’ या आशेपोटी एक वर्षापासून साठवून ठेवलेला उन्हाळ कांदा मातीमोल भावात विकण्याची वेळ शेतकर्‍यावर आली आहे. अवघ्या ११६ रुपये क्विंटलने विक्री झालेल्या कांद्यातून वाहतूक खर्च आणि मजुरीदेखील निघाली नाही. यामुळे आर्थिक विवंचनेत अडकलेल्या शेतकर्‍याने कांदा शेतातच फेकून देण्यात धन्यता मानली.येवला तालुक्यातील विसापूर येथील रमेश पांडुरंग पुरकर या शेतकर्‍याने सुमारे दोन एकर क्षेत्रात उन्हाळ कांद्याची लागवड केली होती. प्रसंगी पाणी विकत घेऊन हा कांदा जगवला होता. कांदा लागवडीपासून कांदा काढणीपर्यंत लाखो रुपयांची मोठी आर्थिक गुंतवणूक करावी लागली.

म्हणून कांदा शेतातच फेकून दिला

दिवाळीनंतर कांद्याचे भाव वाढतात, असा समज असल्याने अनेक शेतकर्‍यांनी कांदा साठवला. कांदा विक्रीतून चार पैसे अधिकचे मिळतील, या आशेपोटी एक वर्षभर हा कांदा चाळीत साठवून ठेवला. रमेश पुरकर यांनी ४ जानेवारीला यातील १६ क्विंटल कांदा मनमाड येथील मार्केट मध्ये विक्रीसाठी घेऊन गेले असता कांद्यास प्रतीक्विंटल ११६ रुपयांचा भाव मिळाला. १६ क्विंटल कांद्याचे खर्च वजा जाता १७३३ रुपये हातात मिळाले. यापैकी १५०० रुपये कांदा वाहतूक भाड्यापोटी द्यावे लागले. हातात २३३ रुपये शिल्लक राहिल्यावर यातून मजुरी देण्याइतके पैसेही शिल्लक राहिले नाहीत. उसनवारी करून मजुरी देण्याची वेळ या शेतकर्‍यावर आली. एक वर्ष जीवापाड जपलेला कांदा तोट्यात सोडा, पण कांदा मार्केट पर्यंत नेण्याचा खर्चही सुटत नसल्याने शेतकर्‍यांनी कांदा शेतात फेकून दिला. नांगरणी झाल्यावर या कांद्याचे खत होईल अनं पुढील वर्षी चांगल्या प्रतीचे पिक येईल, या भाबड्या आशेपोटी लाखो रुपये गुंतवणूक केलेला हा कांद्याचे आता खत तरी होईल, म्हणून डोळ्याआड करावा लागत आहे.

“उन्हाळ कांद्याचे भाव वाढून हातात चार पैसे जास्तीचे येतील या आशेपोटी कांदा साठवून ठेवला. मात्र आता कांद्याच्या वाहतुकीचाही खर्च निघत नसल्याने हाच लाखमोलाचा कांदा शेतात फेकण्याची वेळ आली आहे.”- रमेश पुरकर, विसापूर

First Published on: January 6, 2019 8:37 PM
Exit mobile version