निवडणूक वादातून महिलेला जबर मारहाण

निवडणूक वादातून महिलेला जबर मारहाण

ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान न केल्याच्या कारणावरून निनावी ( ता. इगतपुरी ) येथील 8 जणांनी महिलेला मारहाण केली. यासह महिलेचे केस ओढून मारल्यामुळे गळ्यातील सोन्याची चोरीला गेली. या घटनेत महिला गंभीर जखमी झाल्यामुळे तिच्यावर नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान वाडीवर्‍हे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

इगतपुरी तालुक्यातील निनावी येथील ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच झाली. 24 जूनला मतमोजणी होऊन निकाल घोषित करण्यात आला. शुक्रवारी सायंकाळी 6: 30 वाजता वंदना संपत टोचे (वय 42) ही महिला शेतीच्या कामावरून येत असताना यमुनाबाई चंद्रभान टोचे, कल्पना भाऊसाहेब टोचे, गणेश उर्फ लहानू चंद्रभान टोचे, नथू चंद्रभान टोचे, भाऊसाहेब शांताराम टोचे, गुलाब रामनाथ टोचे, रोहिदास रामनाथ टोचे, शिवाजी निवृत्ती टोचे या 8 जणांनी तक्रारदार वंदना संपत टोचे हिला शिवीगाळ केली. यावेळी आम्हाला निवडणुकीत मतदान का केले नाही, अशी विचारणा करून तुम्हाला पाहून घेतो, असा दम दिला. यातील गणेश उर्फ लहानू चंद्रभान टोचे याने वंदना टोचे हिचे केस धरून तिला ओढत आणले. बाहेर आणल्यावर सर्वांनी तिला बेदम मारहाण केली. गावकर्‍यांनी सोडवासोडव करूनही आरोपींनी मारहाण सुरूच ठेवली होती. यावेळी जखमी महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरीला गेली.

गंभीर जखमी झालेली वंदना संपत टोचे हिने वाडीवर्‍हे पोलीस ठाणे गाठून यमुनाबाई चंद्रभान टोचे, कल्पना भाऊसाहेब टोचे, गणेश उर्फ लहानू चंद्रभान टोचे, नथू चंद्रभान टोचे, भाऊसाहेब शांताराम टोचे, गुलाब रामनाथ टोचे, रोहिदास रामनाथ टोचे, शिवाजी निवृत्ती टोचे, लक्ष्मण केरू टोचे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. जखमी वंदना टोचे हिच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. वाडीवर्‍हे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला आहे.

First Published on: July 1, 2019 8:05 AM
Exit mobile version