अखेर ठरल! राजचंद्र मिशनच्या माध्यमातून ‘ते’ उंट जाणार पुन्हा राजस्थानला

अखेर ठरल! राजचंद्र मिशनच्या माध्यमातून ‘ते’ उंट जाणार पुन्हा राजस्थानला

नाशिक : जिल्ह्यात गेल्या चार पाच दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर उंट दाखल झाले आहेत. हे उंट राजस्थान येथून गुजरातमार्गे महाराष्ट्रात आले. धुळे आणि नाशिक ग्रामीण पोलिसांनी एवढ्या संख्येने ऊंट जात असताना धुळे आणि नाशिक ग्रामीण पोलिसांनी अ‍ॅनिमल वेल्फेअरच्या कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून हे उंट ताब्यात घेतले. सध्या यातील १०९ उंट हे नाशिकच्या चुंचाळे येथील पांजरापोळमध्ये त्यांचे संगोपन करण्यात येत आहे. हे उंट राजस्थानमध्ये परत पाठवावेत की कसे, याबाबत प्रशासनासमोर पेच निर्माण झाला असतानाच धरमपूर येथील श्रीमद् राजचंद्र मिशनने या उंटांच्या वाहतुकीची जबाबदारी उचलली असून, या संस्थेच्या माध्यमातून हे उंट राजस्थानमध्ये परत पाठविण्यात येणार आहेत.

जिल्ह्यात धुळे, सटाणा, दिंडोरी, मालेगाव तालुक्यातून मार्गक्रमण करत उंटांचा मोठा जत्था दाखल झाला. पोट खपाटीला गेलेले, पाय रक्ताळलेले अशा अवस्थेत हे उंट चालत असल्याचे दिसून आले. त्यानुसार सदर उंटांना अन्नपाण्याविना ठेवत शेकडो किलोमीटर चालवल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. यातील तीन उंटांचा मृत्यु झाला. उंटांना क्रूर वागणूक देणार्‍या सात जणांवर दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उंट थकलेले, त्राण गळालेले, पायांवर जखमा असलेल्या अवस्थेत दिसून आले.यानंतर तपोवन परिसरातही २९ उंट आढळून आले. त्यानंतर पुन्हा मालेगावमध्ये ४३ उंट दाखल झाल्याचे निदर्शनास आले. नाशिकमध्ये आढळून आलेल्या १०९ उंटांना पांजरापोळ येथे ठेवण्यात आले असून याच ठिकाणी त्यांच्यावर उपचार केले जात आहे तसेच त्यांचे संगोपनही केले जात आहे.

त्याचप्रमाणे मालेगावमध्येही ४३ उंटांचे संगोपन करण्यात येत आहे. राजस्थान येथून दोन दिवसांत तब्बल १५२ उंट आल्याने एवढ्या संख्येने उंट येण्याची ही पहिलीच वेळ आहे. हे उंट हैदराबाद येथे कत्तलीसाठी पाठवले जात होते असा प्रश्न आहे. यासंदर्भात पालकमंत्री दादा भुसे यांनी चौकशी करून हे उंट परत राजस्थानमध्ये पाठविण्यासंदर्भात सरकारशी संपर्क साधण्याच्या सूचना पालकमंत्री भुसे यांनी दिल्या. मात्र हा पाठपुरावा करणार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या तरी नाशिकच्या पांजरापोळमध्ये या उंटांचे संगोपन केले जात आहे. दरम्यान, या सर्व उंटांचे पशुसंवर्धन विभागामार्फत लसीकरण करण्यात येणार असून त्यानंतर हे उंट या संस्थेच्या ताब्यात सूर्पुत करण्यात येतील. संस्थेमार्फत हे उंट राजस्थानमध्ये नेण्यात येणार आहेत.

उंटांची पुन्हा होणार पायपीट

अगोदरच शेकडो किलोमीटर चालल्यामुळे उंटांच्या पायांना जखमा झालेल्या आहेत. अनेक उंट हे अशक्त असल्याने त्यांना सलाईन दिले जात आहे. अशा परिस्थितीत हे उंट राजस्थानला घेऊन जायचे म्हटल्यास प्रशासनाने वाहनांची व्यवस्था करून देण्याची तयारी दर्शवली. उंटांची उंची अधिक असल्याने ट्रकमधून नेणे शक्य नाही. त्यामुळे उंटांना पायीच घेऊन जावे लागेल. त्यामुळे या उंटांची पुन्हा पायपीट होण्याची शक्यता आहे.

काय आहे राजचंद्र मिशन

श्रीमद राजचंद्र मिशन हे दक्षिण गुजरातमधील धरमपूर शहराच्या बाहेरील भागात २२३ एकर परिसरात एका टेकडीवर वसलेले आहे. जेन धर्माचा प्रचार, प्रसार करणारी ही अध्यात्मिक संस्था आहे. संस्थेच्यावतीने आरोग्य सेवा, शैक्षणिक सुविधा, बाल संगोपन, आदिवासी समाजासाठी कार्य, त्याप्रमाणे प्राण्यांचे संगोपन केले जाते.

धरमपूर येथील श्रीमदक राजचंद्र मिशनने प्रशासनाशी संपर्क साधला असून उंटांच्या वाहतुकीसाठी तसेच त्यांना सुखरूप पुन्हा राजस्थानमध्ये पोहोचवण्याची तयारी दर्शवली आहे. यासंदर्भात संस्थेचे पदाधिकारी पांजरापोळ येथे गुरूवारी भेट देणार असून चर्चेनंतर याबाबत निर्णय घेऊ. : गंगाथरन डी., जिल्हाधिकारी

First Published on: May 11, 2023 11:33 AM
Exit mobile version