अखेर निओ मेट्रोची फाईल पुढे सरकली, पंतप्रधान कार्यालयाला आराखडा सादर

अखेर निओ मेट्रोची फाईल पुढे सरकली, पंतप्रधान कार्यालयाला आराखडा सादर

नाशिक : देशातील पहिला टायर बेस मेट्रो निओ प्रकल्प नाशिकमध्ये साकारला जाणार आहे. मागील दोन वर्षांपासून केंद्रीय मंत्रिमंडळाकडे मंजुरी अभावी प्रस्ताव पडून आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील दोन ते तीन महिन्यात मेट्रोचे काम सुरू होईल अशी घोषणा नाशिकमध्ये भाजपच्या राज्य कार्यकारणी बैठकी दरम्यान केली होती. त्याच अनुषंगाने आता निओ मेट्रो संदर्भातील फाईल पुढे सरकली आहे. महा मेट्रोकडून सविस्तर प्रकल्प आराखड्याचे सादरीकरण केल्यानंतर पंतप्रधान कार्यालयाकडे हा आराखडा सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमधून मुंबईत परतताच दिल्लीमधून मेट्रो निओचे सादरीकरण करण्याच्या सूचना नाशिक महापालिकेला आल्याचे समजते. त्या अनुषंगाने महापालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज दिल्लीत निओ मेट्रो बाबतच्या आराखड्याचे सादरीकरण केले.

महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश मिश्रा, संचालक सुनील माथुर यांच्यासमोर मेट्रोचे सादरीकरण केले. सविस्तर प्रकल्प आराखडा केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर सादर केला जाणार आहे. मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर कामाला गती मिळेल अशी माहिती आता समोर येत आहे.

First Published on: February 16, 2023 4:11 PM
Exit mobile version