अर्णब गोस्वामीविरोधात नाशिकमध्ये तक्रार

अर्णब गोस्वामीविरोधात नाशिकमध्ये तक्रार

पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांना निवेदन देताना नाशिकमधील काँग्रेसचे पदाधिकारी

पालघर येथील झुंडबळीमध्ये दुर्देवी मृत्यू झालेले दोन संत व वाहनचालकाविषयी बातमीपत्र सादर करताना आर. रिपब्लिक चॅनलचे संपादक व सूत्रसंचालक अर्णब गोस्वामी याच्या विरोधात नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी केली आहे. पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्याकडे पदाधिकार्‍यांनी तक्रार केली आहे.
पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे पाच दिवसांपूर्वी ही दुर्देवी घटना घडली. या विषयी वार्तांकन करताना अर्णब गोस्वामी याने हिंदू-मुस्लिम समाजमध्ये तेढ निर्माण करणारे व शत्रुत्व वाढविणारे चिथावणीकरक सूत्रसंचालन केले. तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या बद्दल अपमानास्पद अपशब्द वापरून त्यांची बदनामी केली. पालघर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने व पोलिसांनी आरोपीना अटक केलेली असताना गोस्वामी याने जाणून बुजून सदर कृत्य केल्याचा गंभीर आरोप युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील यांनी केला आहे. त्यामुळे गंगापूर पोलीस ठाण्यात रितसर तक्रार नोंदवत त्यांनी कारवाईची मागणी केली. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर, प्रदेश सचिव डॉ.हेमलता पाटील आदी उपस्थित होते.

First Published on: April 23, 2020 5:31 PM
Exit mobile version