शेवाळामुळे लांबला फ्लेमिंगोंचा गुजरात दौरा

शेवाळामुळे लांबला फ्लेमिंगोंचा गुजरात दौरा

नांदुरमधमेश्वर अभयारण्य परिसरात रमलेले फ्लेमिंगो

महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळख असलेल्या नांदूर मध्यमेश्वरमध्ये दहा वर्षानंतर प्रथमच जानेवारीच्या पंधरवड्यानंतर तब्बल ३०० पेक्षा अधिक फ्लेमिंगोंनी मुक्काम वाढवला आहे. एरवी डिसेंबरनंतर पक्षी गुजरातकडे रवाना होतात. मात्र, यंदा जलाशयातील पाण्याची पातळी व त्यात वाढलेले शेवाळ यामुळे फ्लेमिंगोंचा ‘गुजरात दौरा’ लांबणीवर पडला आहे.

नाशिकपासून अवघ्या ५० किलोमीटर अंतरावरील नांदूरमध्यमेश्वर अजूनही पर्यटकांच्या गर्दीने फुललेले दिसते. यंदा प्रथमच दीर्घकाळ फ्लेमिंगोंचा अधिवास वाढल्याने पर्यटन प्रेमींना पर्वणी लाभली आहे. साधारणत: सप्टेंबर महिन्याच्या सुमारास पक्षी नांदूरमध्यमेश्वरला येण्यास सुरुवात होते. यंदा ७०० पेक्षाही अधिक फ्लेमिंगो दाखल झाले होते. वर्षअखेरीस किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हे पक्षी परतीच्या मार्गाला लागतात. वन विभागाने केलेल्या निरीक्षणानुसार गुजरातमधील कच्छमधील दलदलीच्या प्रदेशात अर्थात लिटल रन ऑफ कच्छमध्ये फ्लेमिंगो स्थलांतरीत होतात. यंदा मात्र, अजूनही नांदूरमध्यमेश्वरला २५० पेक्षा अधिक फ्लेमिंगो मुक्कामी थांबल्याचे दिसत आहेत. यंदा डिसेंबरनंतर धरणातून आवर्तन सोडण्यात आलेले नाही. त्यामुळे पाणी साचलेले आहे. साचलेल्या पाण्यात शेवाळ वाढल्याने फ्लेमिंगोंना खाद्य उपलब्ध होत आहे. परिणामत: पक्षांनी अधिवास वाढवल्याचे वनविभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

खाद्य मिळत असल्याने मुक्काम वाढला

जानेवारीच्या मध्यानंतरही मोठ्या प्रमाणात फ्लेमिंगो थांबण्याची यंदाची दहावर्षानंतरची पहिलीच वेळ आहे. जलाशयात शेवाळाचे प्रमाण सध्या मुबलक आहे. त्यामुळे फ्लेमिंगोंना खाद्य मिळत असल्याने त्यांचा मुक्काम वाढल्याचे दिसते.
– भगवान ढाकरे, वनपरिक्षेत्र अधिकारी, नांदूरमध्यमेश्वर

First Published on: January 24, 2019 2:33 PM
Exit mobile version