चार बाजार समित्यांची निवडणूक लांबणीवर

चार बाजार समित्यांची निवडणूक लांबणीवर

प्रातिनिधीक फोटो.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता व दुष्काळसदृश स्थिती यामुळे जिल्ह्यातील चार बाजार समित्यांची निवडणूक लांबणीवर टाकण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. देवळा, उमराणे, घोटी व सुरगाणा या बाजार समित्यांची निवडणूक ३१ मेनंतर घेण्याचे आदेश शासनाने काढल्यामुळे जून महिन्यात या निवडणुकांचा बिगूल वाजणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या धर्तीवर बाजार समित्यांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय गेल्या वर्षी घेण्यात आला. तसेच दहा एकर क्षेत्र असणार्‍या व नियमित समित्यांमध्ये शेतीमाल विक्री करणार्‍या शेतकर्‍यांना मतदार म्हणून मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. यानंतर जिल्ह्यातील सटाणा बाजार समितीची निवडणूकही पार पडली. देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत संपली असून, त्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ मिळालेली आहे, तीही मुदतवाढ संपुष्टात आलेली आहे. उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मंडळ नियुक्त असल्याने निवडणूक घेणे आवश्यक आहे. घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीची मुदत ३१ मार्चला संपुष्टात आलेली असून, त्यांना मुदतवाढीसाठी संचालक मंडळाने न्यायालयात दाद मागितलेली आहे. सुरगाणा कृषी उत्पन्न बाजार समितीची मुदत संपली आहे; परंतु निधीअभावी निवडणूक रखडली होती.

या चारही बाजार समित्यांच्या निवडणुका मे महिन्यात घेण्याचे सहकार प्राधिकरणाचे नियोजन होते. राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. तसेच लोकसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. त्यामुळे लोकसभेची आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी ज्या समित्यांमध्ये निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. त्या वगळून इतर मुदत संपणार्‍या समित्यांमध्ये नंतरच निवडणुका घेण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. या निर्णयामुळे विद्यमान सदस्यांना दोन महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे.

First Published on: April 17, 2019 7:05 AM
Exit mobile version