आचारसंहिताभंगाचे चार गुन्हे दाखल

आचारसंहिताभंगाचे चार गुन्हे दाखल

निवडणूक काळात आचारसंहिता भंग होऊ नये सिविजील अ‍ॅपद्वारे तक्रारी दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अ‍ॅपद्वारे आतापर्यंत ३५ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातील १३ तक्रारींमध्ये तथ्य आढळून आले आहे. यातील चार तक्रारींमध्ये संबधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अन्य २२ तक्रारी तथ्यहीन असल्याचे समोर आले आहे.

चांदवड तालुक्यातील मौजे साळसाने ग्रामपंचायतीमार्फत विविध विकास कामांना साहित्य खरेदीसाठी वित्त वर्ष २०१८-१९ साठी ऑनलाईनरीत्या १५ मार्च ला दुपारी १२ ला इ-निविदा घेतल्याने सरपंच ललिता ठाकरे व ग्रामसेवक सोमनाथ गायकवाड यांच्यावर चांदवड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे. तसेच एका वर्तमानपत्रात अनोळखी व्यक्तीने बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांचे नाव व चिन्ह असलेले पत्रके वाटप केल्याने पोलिसांनी अदलखपात्र गुन्हा दाखल केला आहे. येवला तालुक्यातील मुरमी ग्रामपंचायतीत १४ वा वित्त आयोग व मनरेगा अंतर्गत विविध कामांमध्ये अंदाजे एक कोटीपेक्षा अधिकचा भ्रष्टाचार झालेला असल्याने कामांची चौकशी होण्यासाठी ९ ग्रामस्थ प्रशासकीय इमारत येवला येथे प्रांगणात मंडप टाकून उपोषणास बसले होते. त्यामुळे संबंधित ९ ग्रामस्थ यांनी शासकीय जागेचा आचारसंहितेच्या कालावधीत विनापरवाना वापर केल्याने त्यांचे विरुद्ध येवला पोलीस ठाण्यात आचारसंहिता उल्लंघनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक महापालिकेच्या शिक्षण विभागात मुख्याध्यापिका म्हणून काम करणार्‍या काकड यांनी आचारसंहितेत मनपाच्या शाळा क्र ९, फुले नगर येथील वर्ग खोलीचे फीत कापून राजकीय पक्षाच्या पदाधिकार्‍यांच्या हस्ते उद्घाटन केले म्हणून त्यांच्या विरोधात कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First Published on: April 1, 2019 12:06 AM
Exit mobile version