भक्तांसाठी जमिनीतून सोने काढणार्‍या भोंदूबाबाला मुंबईत अटक

भक्तांसाठी जमिनीतून सोने काढणार्‍या भोंदूबाबाला मुंबईत अटक

जमिनीतून सोने काढून देतो, भरपूर धनलाभ करुन देण्याचे आमिष भक्तांना दाखवणार्‍या भोंदूबाबाला अखेर नाशिक शहर पोलिसांनी तब्बल ९ महिन्यांनी सापळा रचत मुंबईतून अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून ४ विविध प्रकारचे रिझर्व्ह बँकेचे लोगो असलेले बनावट सोन्याच्या ४० कॉईनस व कोरे स्टॅप पेपर जप्त केले. भोंदूबाबाने आश्रम उभारणीसाठी किती भाविकांना चुना लावला आहे, याचा पोलीस शोध घेत आहेत. श्रद्धा व्हिला, पाथर्डी फाटा, नाशिक येथील राहणारा असून नाव गणेश जयराम जगताप (वय ३७) असे अटक करण्यात आलेल्या भोंदूबाबाचे नाव आहे.

गणेश जगताप हा स्वत:ला श्री १००८ महंत गणेश आनंदगिरी महाराज सांगून मच्छिंद्रनाथ ट्रस्ट स्थापन करुन बडे बाबा नावाने आश्रम इंदिरानगरमध्ये चालवत होता. रुग्णालय व मुलींचे वसतिगृह बांधायचे आहे. त्यासाठी मोठी रक्कम लागणार आहे. आमच्याकडे सोने आहे. यज्ञ केल्याशिवाय ते विकता येणार नाही, असे सांगत जगन्नाथ खंडेराव जाधव यांचा भोंदूबाबाने विश्वास संपादन केला. त्यांच्याकडून ५२ लाख रुपये घेवून ते परत न करता त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी ६ मार्च २०२० रोजी जगन्नाथ जाधव यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर जमिनीतून सोने काढून देतो, असे सांगून भोंदूबाबाने उखराज चौधरी यांच्याकडून ११ लाख २६ हजार रुपये घेत एक किलो सोने आहे, असे भासवून धातूची वीट देत त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी भोंदूबाबाविरोधात सातपूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांची चाहूल लागताच जगताप याने बडेबाबा आश्रम सोडून पलायन केले होते. तो तब्बल ९ महिने फरार होता.

पैशांच्या बदल्यात दिले न वठणारे धनादेश

गणेश जगताप हा भोंदुबाबा असून तो मुंबईत राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मुंबईतील काश्मिरा पोलीस ठाणे हद्दीतील जीसीसी क्लब, हाटकेश येथून त्याला सापळा रचत अटक केली. त्याची चौकशी केली असता त्याने श्रद्धा व्हिला, पाथर्डी फाटा, नाशिक येथील राहणारा असून नाव गणेश जयराम जगताप (वय ३७) सांगितले. त्याने खोटे बोलून पैसे घेवून परत देण्याच्या बदल्यात धनादेश दिले. प्रत्यक्षात ते धनादेश वठले नाहीत. पुढील तपासासाठी त्यास इंदिरानगर पोलिसांचा ताब्यात देण्यात आले आहे.

First Published on: December 16, 2020 7:40 PM
Exit mobile version