लॉकडाऊनमध्ये माणुसकीचा उष:काल; नाशिककरांकडून गरजूंना जेवण

लॉकडाऊनमध्ये माणुसकीचा उष:काल; नाशिककरांकडून गरजूंना जेवण

करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाऊन करण्यात आल्याने कामगार, निराधार, भिकारी व गरीबांवर उपासमारीची वेळ आली आहे. करोनाविरोधात लढण्यासाठी त्यांच्यामध्ये पौष्टिक आहारातून प्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी नाशिककरांनी पुढाकार घेतला आहे. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या सुदृढ आरोग्यासाठी वुई फाऊंडेशनने डॉक्टरांना पौष्टिक आहार दिला जात आहे. मुंबईनाका परिसरातील दिपालीनगर येथील श्रीजी सेंट्रम सोसायटीतील रहिवाशांनी जमा केलेल्या 80 हजार रुपयांमधून गरजूंना किराणा वाटप केला आहे. तर, महावितरणमध्ये जनमित्र म्हणून काम करणार्‍यांनी दिंडोरीनाका परिसरात गरजूंना जेवण वाटप केले.

महावितरणच्या जनमित्रांतर्फे निराधारांना अन्नवाटप

करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्याने निराधार, भिकारी व गोरगरीबांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना जेवण मिळावे, यासाठी महावितरणमध्ये जनमित्र म्हणून काम करणार्‍या योगेश बर्वे, हर्षल कुमावत यांनी सोमवारी (दि.३०) दिंडोरीनाका परिसरात गरजूंना जेवण वाटप केले.

वुई फाउंडेशनतर्फे डॉक्टरांना जेवण

लॉकडाऊनच्या काळात डॉक्टरांसह विविध घटकांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर यांनी व्यक्ती व संस्थांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे. त्यास वुई फाउंडेशनने प्रतिसाद देत जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व परिचारिकांना जेवण उपलब्ध केले आहे. भाजी, पोळीसह फळांचाही समावेश केला आहे. जेवण रुग्णालयातील आहार विभागाच्या शिला कांबळे यांच्यामार्फत वाटप केले जात आहे.

श्रीजी सेंट्रम सोसायटीतर्फे किराणा वाटप

करोनाच्या पार्श्वभूमीवर हातमजूर, निराधार, गोरगरीबांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात, त्यांना जेवण मिळावे, यासाठी मुंबईनाका परिसरातील दिपालीनगर येथील श्रीजी सेंट्रम सोसायटीतील रहिवाशांनी एकत्रित 80 हजार रुपये जमा केले. नाशिक महापालिका व पोलिसांच्या परवानगीने त्या पैशातून भारतनगर, बुधवार पेठ, हरी मंजील परिसरातील अंध मोलमजूर, अनाथ, दिव्यांग व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंचे 80 पॅकेट किराणा वाटप केले. रहिवाशांच्या उपक्रमाची दखल घेत श्रीजी सेंट्रम बिल्डींगचे बिल्डर अंजान पटेल यांनी 50 हजार रुपये देण्याचे जाहीर केले. याप्रसंगी चेअरमन डॉ. खालिद सैय्यद, आरिफ पठाण, ईमरान शेख, अमन सैय्यद, शाहीद शेख, दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष बबलु मिर्झा, अर्शद पठाण, करीम शेख, पंकज सुर्यवंशी, नाजिम शेख आदींचे सहकार्य लाभले.

First Published on: March 30, 2020 7:39 PM
Exit mobile version