डोळ्याने नव्हे तर स्पर्शाने घेतली अनुभूती अन् साकारले बाप्पा

डोळ्याने नव्हे तर स्पर्शाने घेतली अनुभूती अन् साकारले बाप्पा

गणपती बाप्पाची मोहिनी सर्वांनाच आहे. त्यात अंध विद्यार्थीही अपवाद ठरु शकलेले नाही. त्यांनी बाप्पाचे रुप आपल्या डोळ्याने बघीतले नसले तरीही त्यांच्यातील श्रध्देने बाप्पा अगदी सहजपणे साकारले गेले.. निमित्त होते नॅब संकुलात अंध विद्यार्थ्यांच्या गणपती बनवण्याच्या कार्यशाळेचे. मूर्तीकार स्नेहा अशोक शिंदे-भालेकर यांनी आपल्या अनोख्या प्रशिक्षणातून ही किमया घडली.

दिव्यांग विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून गणपती बनवण्याची कार्यशाळा काही दिवसांपूर्वी स्नेहा यांनी घेतली. त्याचप्रमाणे मानसिक अपंग विद्यार्थ्यांनाही त्यांनी प्रशिक्षण दिले. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनी अंध विद्यार्थ्यांना मूर्तीकामाचे प्रशिक्षण देण्याचे दिव्य पार पाडले. ज्यांनी कधी बाप्पाचे रुप डोळ्याने बघीतलेले नाही, त्यांच्या हातून बाप्पांना साकारुन घेणे ही तशी अवघड बाब होती. परंतु शाळेच्या शिक्षिकांच्या मदतीने हे काम साध्य करता आले. यासाठी प्रथमत: अंध विद्यार्थ्यांच्या हाता गणपतीची मूर्ती देण्यात आली. त्यांनी या मूर्तीवरुन हात फिरवत आकार जाणून घेतला. त्यानंतर शाडू मातीपासून एक-एक अवयव बनवून विद्यार्थिनींच्या हातात देण्यात आलेत.

एकदा हे भाग हाताळल्यानंतर तसेच आकार तंतोतंत करण्यात येत होते. त्यामुळे उपस्थित डोळसही चकीत झालेत. मूर्ती साकारल्यानंतर अंध विद्यार्थिनींच्या चेहर्‍यावरील आनंद अवर्णनीय होता असे स्नेहा यांनी सांगितले. या कामात स्नेहा यांना श्रध्दा शिंदे, सुवर्णा शिंदे, राहुल भालेकर, मुख्याध्यापिका वर्षा साळुंखे, शिक्षिका स्मीता सोनी, लता आव्हाड, लीना गायकवाड यांनी मोलाचे सहकार्य केले.

First Published on: September 5, 2019 11:56 PM
Exit mobile version