गोडसेंनी भुजबळांना चरणस्पर्श करत घेतले आशीर्वाद

गोडसेंनी भुजबळांना चरणस्पर्श करत घेतले आशीर्वाद

रामनवमीनिमित्त पंचवटीतील काळाराम मंदिरात दर्शनासाठी लोकसभा निवडणुक इच्छुकांनी गर्दी केली होती. यावेळी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि खासदार हेमंत गोडसे हे समोरासमोर आले. यावेळी गोडसे यांनी भुजबळांचे चरणस्पर्श करत आशीर्वाद घेतले. महायुतीत असलेले हे दोन्ही नेते नाशिक मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. असे असताना या दोघांची भेट होणे आणि गोडसेंनी भुजबळांचे आशिर्वाद घेणे, या घटनेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

नाशिक लोकसभेसाठी शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे इच्छुक आहेत. तर राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांचे नाव पुढे आले आहे. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे महायुतीचा नाशिक मतदारसंघाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही, त्यामुळे लोकसभेचे तिकीट नेमके कुणाला मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान बुधवारी काळाराम मंदिरात रामनवमीचा उत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मंदिरात दर्शन घेऊन हेमंत गोडसे जात होते. त्याचवेळी छगन भुजबळ दर्शनासाठी आले, त्यावेळी दोघांची भेट झाली. दोघा नेत्यांची भेट होताच गोडसे यांनी भुजबळांचे चरणस्पर्श केले. दोघे प्रतिस्पर्धी समारोसमोर आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

उमेदवारीची संधी आणि विजय मिळो
मराठी संस्कृतीमध्ये ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतात, त्यामुळे रामाचे दर्शन झाल्यानंतर भुजबळांची भेट होताच मी त्यांचे आशीर्वाद घेतले. हे आशीर्वाद नक्की कशासाठी घेतले, ते प्रभू रामचंद्रांना माहित. आपल्याला उमेदवारीची संधी लवकर प्राप्त होवो आणि विजय पण मिळो ही काळारामाकडे प्रार्थना केली. 10 वर्षे मी खासदार राहिलोय, नाशिकला पुन्हा धनुष्यबाण येईल.
खा. हेमंत गोडसे

गोडसेंना शुभेच्छा
गोडसे माझे मित्र आहेत. योगायोगाने आमच्या दोघांची भेट झाली. मी गोडसेंना शुभेच्छा दिल्या आहेत. मी आज नाशिकमध्ये होेतो म्हणून सहकुटुंब दर्शनासाठी आलो. महायुती जो कोणी उमेदवार देईल त्याचा प्रचार करेल.
छगन भुजबळ, मंत्री महाराष्ट्र राज्य

First Published on: April 17, 2024 3:47 PM
Exit mobile version