हुशशश…! नाशिकमध्ये करोनाग्रस्त रुग्ण नाही

हुशशश…! नाशिकमध्ये करोनाग्रस्त रुग्ण नाही

करोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. खबरदारी म्हणून परदेशवारी केलेले 517 नागरिक मायदेशी आल्यावर त्यांना जिल्हा आरोग्य विभाग निगराणीखाली ठेवत असून 457 जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. उर्वरित 60 जणांवर जिल्हा रुग्णालय, डॉ. जाकीर हुसेन रुग्णालय व सामान्य रुग्णालय मालेगाव येथे उपचार करण्यात आले असून सर्वाचे स्वॅब नमुने तपासणी केल्यानंतर निगेटिव्ह आले आहेत. नाशिकमध्ये अद्यापही एकही करोनाग्रस्त रुग्ण नसल्याने जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेचे राज्यभर कौतुक होत आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात 21 दिवस लॉकडाऊन करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि.24) केली. नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही पण काळजी घ्यावी, घराबाहेर पडू नये, स्वतः आणि कुटूंबाचे आरोग्य तुमच्याच हाती आहे, असे आवाहन मोदींनी केले आहे. जिल्ह्यात संचारबंदी, जमावबंदीसह जिल्हा व राज्य सीमा सील करण्यात आल्या आहेत. परदेशवारी करून मायदेशी आलेल्या नागरिकांसह पुणे व मुंबईतून नाशिकला आलेल्या नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. गुरूवारपर्यंत परदेशातून नाशिक जिल्ह्यात आलेल्या 517 नागरिकांची नोंद झाली असून सर्वजण निरोगी असल्याने आरोग्य यंत्रणेने सुटकेचा निःश्वास टाकला आहे. तसेच, अद्याप एकही करोनाग्रस्त रूग्ण नाशिक शहर व जिल्ह्यात आढळून आलेला नाही. त्यामुळे नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नाशिक करोना अहवाल

निगराणीखाली असलेले रुग्ण  517 

उपचारासाठी दाखल झालेले रुग्ण    60

तपासणी केलेले नमुने 60

निगेटिव्ह रिपोर्ट 60

पॉझिटिव्ह रिपोर्ट 00

प्रलंबित रिपोर्ट 00

गुरूवारी दाखल झालेले रुग्ण 00

First Published on: March 26, 2020 7:08 PM
Exit mobile version