गरिबांची डाळ शिजणार

गरिबांची डाळ शिजणार

दुष्काळात आता महागाईची भर पडली आहे. यंदा दुष्काळामुळे पेरणी कमी झाल्याने डाळींचे दर वाढले आहेत. तूरडाळीसह मूगडाळ, उडीद डाळीचे दर शंभरीपार गेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी रेशन दुकानातून तूरडाळ उपलब्ध करून देण्यात आली असून पुरवठा विभागाने पुन्हा तीन हजार क्विंटल डाळीची मागणी केली आहे.

निसर्गाचे बदलतेे चक्र आणि शेतकर्‍यांचा नगदी पीक घेण्याकडे वाढलेला कल यामुळे दिवसेंदिवस कडधान्य आणि तृणधान्याचे उत्पादन कमी होत आहे. तरीही बहुतांश शेतकरी तूर, उडीद, मूग यांची लागवड करतात. मात्र, पावसाने ओढ दिल्याने या पिकांचे उत्पादन घटले. केंद्रात भाजपचे सरकार आल्याने अन्नधान्य तसेच जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी होतील, अशी सर्वसामान्यांना आशा होती. मात्र, महागाई वाढतच असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. सध्या बाजारात तूर, उडीद, मूग, हरभरा या डाळींचे दर वाढले आहेत. यापूर्वी केंद्र सरकारने पाच हजार मेट्रिक टन तुरडाळीची आयात केली होती. किरकोळ दुकानात डाळीने शंभरीपार केली असून सध्या तूरडाळ १०० ते १३० रुपये किलो दराने विकली जात आहे. मूगडाळही शंभरीच्या उंबरठ्यावर पोहोचली असून उडीद डाळीने १२० रुपयांचा भाव गाठला आहे. गेल्या दोन महिन्यांत डाळींच्या किंमतीत २० ते ५० रुपयांची वाढ झाली. डाळींच्या वाढत्या किंमतीने कुटुंबाचे आर्थिक नियोजन कोलमडून पडणार आहे. नाशिक जिल्हा पुरवठा विभागाने यापूर्वीही रेशन दूकानातून शिधापत्रिका धारकांना तूरडाळ उपलब्ध करून देत महागाईपासून दिलासा दिला होता. सध्या जूनपर्यंंत डाळींचा साठा उपलब्ध असून आणखी ३ हजार क्विंटल तूरडाळीची मागणी पुरवठा विभागाकडून करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अंत्योदय आणि प्राधान्यक्रम अशा सुमारे सहा लाख शिधापत्रिकाधारकांना ५५ रुपये किलो दराने डाळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

१५ दिवसांचा डाळीचा साठा शिल्लक

सध्या आपल्याकडे १५ दिवसांचा डाळीचा साठा आहे. डाळींचे वाढते दर बघता आणखी ३ हजार क्विंटल तूरडाळीची मागणी करण्यात येणार आहे. गेल्यावेळी ६ लाख शिधापत्रिकाधारकांना तूरडाळ उपलब्ध करून देण्यात आली. – श्रीनिवास अर्जुन, जिल्हापुरवठा अधिकारी

First Published on: June 6, 2019 7:25 AM
Exit mobile version