एचएएलच्या प्रायोजकत्वातून कबड्डीपटूंची ‘पकड’ होणार मजबूत

एचएएलच्या प्रायोजकत्वातून कबड्डीपटूंची ‘पकड’ होणार मजबूत

नाशिकच्या आदिवासी क्रीडा प्रबोधिनीला हिंदूस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल)चे प्रायोजकत्व लाभले असून, नुकत्याच झालेल्या या कराराअंतर्गत प्रबोधिनीच्या कबड्डीपटूंना दर्जेदार ट्रॅक सूट, बुट आणि अन्य सुविधा पुरविण्यात येणार आहेत. शिवाय तीन वर्षे खेळाडूंचा प्रवास व अन्य खर्च एचएएलकडून केला जाणार असल्याने खेळाडू विकासाला अधिक चालना मिळणार आहे. परिणामी, नाशिकच्या क्रीडाविश्वातून आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत हे खेळाडू भरारी घेऊ शकतील.

मातीतल्या खेळांना पुन्हा सुगीचे दिवस येताय, म्हणूनच की काय आता बड्या प्रायोजकांकडूनही मातीतल्या खेळांना आर्थिक पाठबळ दिले जात असल्याचे दिसून येत आहे. खो-खो, कुस्ती, अ‍ॅथलेटिक्ससह आता कबड्डीलाही मोठ-मोठे प्रायोजक लाभत असल्याने खेळाडूंना अधिक चांगल्या दर्जाचा सराव आणि प्रशिक्षण घेणे शक्य होणार आहे. गेल्या वर्षी १७ वर्षाखालील शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये नाशिकच्या क्रीडा प्रबोधिनी मुलांच्या संघाने विजेतेपद पटकावले होते. मुलीही शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये मेडलिस्ट ठरल्या आहेत. यात सुनंदा पवार, मालती गांगुर्डे ज्योती पवार यांनी राज्यस्तरावर पदकांची लयलूट करीत आपली छाप सोडली आहे. मुलांमध्येही अमोल गेडाम, संभा मडावी, अंकुश मेश्राम हेदेखील राज्यस्तरावर पदकविजेते राहिले आहेत. या सर्व खेळाडूंना पाच टक्के आरक्षण असते. सुनंदा पवार ही महाराष्ट्र संघाची कर्णधार राहिली आहे. या सर्वांचा खर्च आदिवासी विभागाकडून केला जातो. त्यांचे शिक्षण, आरोग्य, प्रवास आणि अन्य खर्च आदिवासी विभागाकडून केला जातो. मात्र, त्यावर मर्यादा येतात. याच पार्श्वभूमीवर आता हिंदूस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने या खेळाडूंना प्रायोजकत्व देण्याचा निर्णय घेतला असून, तसा करार नुकताच करण्यात आला. त्यानुसार आता या खेळाडूंना या पुढील कामगिरीसाठी अधिक चांगल्याप्रकारे प्रोत्साहन मिळणार आहे. अद्ययावत सुविधा, चांगल्या दर्जाचे ड्रेस, शुज व अन्य साहित्य त्यांना मिळणार असल्याने त्यांच्या कामगिरीचाही दर्जा नक्कीच उंचावेल, अशी अपेक्षा प्रबोधिनीच्या प्रशिक्षिका भारती जगताप यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना व्यक्त केली.

तीन सत्रांत सराव करणार्‍या आदिवासी क्रीडा प्रबोधिनीच्या या राज्यस्तरीय कबड्डीपटूंना जीम, पोषक आहार, प्रशिक्षण या सुविधादेखील पुरवल्या जातात. आठ-आठ तास कबड्डीसाठी घाम गाळणार्‍या या खेळाडूंच्या निवासाची सुविधादेखी मीनाताई ठाकरे स्टेडियम परिसरातील वसतिगृहात करण्यात आली आहे. त्यांचा सरावही याच ठिकाणी सुरू असतो. नुकत्याच झालेल्या नाशिक जिल्हा कबड्डी लीगमध्येही प्रबोधिनीच्या खेळाडूंनी आपली वेगळी छाप सोडत संपूर्ण स्पर्धेत दबदबा निर्माण केला होता. बिहार येथे १७ जुलैपासून महिलांची सिनियर नॅशनल चॅम्पियनशीप होणार असून, त्यासाठी क्रीडा प्रबोधिनीच्याच ज्योती पवारची संघासाठी निवड करण्यात आली आहे. तिचे सराव शिबिर मुंबई येथे होणार असून, राज्यस्तरावर पोहोचलेली नाशिकमधील ती सर्वात कमी वयाची कबड्डीपटू ठरली आहे. नाशिक कबड्डी लीगमध्येही ती बेस्ट रेडरची मानकरी ठरली आहे. अन्य स्पर्धाही तीने गाजवल्या आहेत. सुनंदा पवारने यंदाचा बेस्ट कबड्डी प्लेअरचा पुरस्कार पटकावला आहे. अशा या सर्व कबड्डीपटूंना आता प्रायोजकत्वामुळे अधिक चांगली कामगिरी करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

नाशिकच्या कबड्डीसाठी सुखावह बाब

नाशिकच्या आदिवासी क्रीडा प्रबोधिनीला एचएएलकडून मिळालेल्या प्रायोजकत्वामुळे मोलाची साथ लाभेल. खेळाडूंना अधिक चांगल्या दर्जेदार सुविधा उपलब्ध होऊ शकतील. ज्यामुळे त्यांचा उत्साह दुणावेल, ज्याचा परिणाम त्यांच्या कामगिरीवर होईल. राज्यस्तरावर आपला दबदबा कायम ठेवणार्‍या नाशिकच्या आदिवासी कबड्डीपटूंच्या संख्येत वाढ होऊन त्यांची कामगिरी अधिक उंचावली पाहिजे, यासाठी आम्ही सर्वच प्रयत्नशील आहोत. – भारत जगताप, कबड्डी प्रशिक्षक, आदिवासी क्रीडा प्रबोधिनी

First Published on: June 28, 2019 11:47 PM
Exit mobile version