उन्हामुळे अंगाची लाही, जिल्ह्यात कांदा काढण्याची घाई

उन्हामुळे अंगाची लाही, जिल्ह्यात कांदा काढण्याची घाई

Onion Harvesting

शशिकांत बिरारी । कंधाणे
कमी पर्जन्यमानामुळे तीव्र दुष्काळाच्या झळा, कांदा रोपांची टंचाई, गगनाला भिडलेले रासायनिक खतांचे दर, वाढलेली मजुरी, अनियमित भारनियमन अशी संकटांची मालिका पार करत बळीराजाने कांदा काढणीला सुरुवात केली आहे. भरउन्हात घाम गाळत हे काम सुरू असले तरीही कांद्याला अपेक्षित भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी मात्र नाराज आहे.

कांदा पिक काढणीस आले आहे. सध्या या भागात उन्हाची तीव्रता वाढत असून, हवामान तज्ज्ञांनी अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. उन्हामुळे अंगाची लाही लाही आणि कांदा काढण्याची घाई, असे चित्र तालुक्यात दिसते आहे. गेल्यावर्षी याच दिवसात प्रचंड गारपीट झाल्याने रब्बी हंगामातील कांदापीक नेस्तनाबूत झाले होते. टाकले भांडवलही निघाले नसल्याने बळीराजाला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला होता. यंदा तालुक्यात अत्यल्प पर्जन्यमानामुळे सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. बारमाही पाणी असलेल्या विहिरींनी मार्चच्या शेवटी तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत तालुक्यात काही भागांत आतापासूनच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत असल्याचे चित्र दिसून येत आहे. चालू हंगामात कांदा रोप टाकण्याच्या हंगामात बेमोसमी पाऊस पडल्याने त्याचा परिणाम कांदा रोपांच्या उतरणीवर झाला होता. यामुळे चालू रब्बी हंगामात कांदा रोपांचा प्रचंड तुटवडा भासत आहे.

कांदा लागवड पूर्ण करण्यासाठी बळीराजाने सोन्याच्या दरात कांदा रोप खरेदी करून लागवड केली होती. रोपांच्या टंचाईमुळे कांदा लागवड जानेवारीपर्यंत सुरू होती. पाणीटंचाई व वाढत्या उन्हाच्या प्रकोपामुळे कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून, उत्पादनात घट झाली आहे. बागलाणच्या पश्चिम पट्ट्यात दरवर्षी बाहेरील मजूर कांदा काढणीसाठी होतात. यंदा सर्वत्र दुष्काळाच्या झळा असल्याने मोठ्या प्रमाणावर मजूर हजेरी लावतील असा अंदाज होता. मात्र, अद्याप अपेक्षित प्रमाणात मजूर उपलब्ध झाले नसल्याचे चित्र आहे. वाढत्या उन्हाच्या प्रकोपामुळे मजूर वर्गाच्या मेहनतीवर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.

First Published on: April 10, 2024 10:40 PM
Exit mobile version