नाशकात १७ वर्षांतील तापमानाचा उच्चांक

नाशकात १७ वर्षांतील तापमानाचा उच्चांक

उन्हाचा पारा वाढला

एकीकडे लोकसभा निवडणुकीने वातावरण आधीच तापलेले असताना, दुसरीकडे उष्णतेच्या लाटेनेही नाशिकला घेरले आहे. कधीकाळी थंड शहर म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये शनिवारी, २७ एप्रिलला १७ वर्षांच्या इतिहासात प्रथमच तापमानाचा पारा ४२.६ अंशांवर पोहोचल्याने, दुपारच्या सुमारास उन्हाच्या चटक्याने नाशिककर अक्षरश: भाजून निघाले. दरम्यान, मालेगावात ४३, तर नंदुरबारमध्ये पारा तब्बल ४५ अंशांवर गेला आहे.

नाशिकमध्ये २००३ पासून अद्याप तापमानाचा पारा ४२.१ अंशांपार सरकल्याची नोंद नव्हती; मात्र यंदा एप्रिल महिन्यातच ४२.६ अंश इतके तापमान नोंदविले गेल्याने नाशिककरांच्या जिवाची काहिली झाली. बुधवार, २४ एप्रिलपासून नाशिककर कडाक्याच्या उन्हाचा सामना करत आहेत. ३८ अंशांवरून तापमानाचा पारा थेट चाळीशीवर पोहोचला. ४०.९ अंश इतके तापमान बुधवारी नोंदविले गेले. तर, गुरुवारी काही अंशी घट होऊन पारा ४०.५ अंशांवर स्थिरावला; मात्र शुक्रवारी अचानकपणे वातावरणात उष्मा वाढला व वार्‍याची गती मंदावल्याने मागील चार वर्षांपेक्षा अधिक ४१.७ अंशांपर्यंत कमाल तापमानाचा पारा पोहोचला. त्यामुळे शुक्रवारी दिवसभर शहरातील सर्वच रस्त्यांवर शुकशुकाट होता. सायंकाळी ६ वाजेपर्यंत शहरातील मध्यवर्ती भागातील रस्त्यांवर फारशी वर्दळ दिसून आली नाही. सूर्यास्तानंतरही नाशिककरांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. कारण कमाल तापमानासोबत किमान तापमानाचा पारादेखील मागील चार वर्षांपासून चढता आहे. किमान तापमान शुक्रवारी २३.२ अंश इतके नोंदविले गेले. मात्र, शनिवारी याहीपेक्षा अधिक तापमानाने नाशिककरांना होरपळले.

नाशिकचे २००३ पासूनचे तापमान असे… (दिनांक व तापमान)

मे २००३- ४२.१
मे २००४- ४१.४
मे २००५- ४०.७
मे २००६-३९.८
मे २००७- ४१.५
एप्रिल २००८-४१.४
एप्रिल २००९-४१.४
एप्रिल २०१०- ४२.०
एप्रिल २०११- ४०.४
एप्रिल २०१२- ४०.०
मे २०१३ – ४०.०
मे २०१४ – ४०.०
एप्रिल २०१५ – ४०.६
मे २०१६ – ४१.०
मार्च २०१७ – ४१.१
मे २०१८ – ४१.५
एप्रिल २०१९ – ४२.६

First Published on: April 27, 2019 10:30 PM
Exit mobile version