नुसते पाणीच पाणी…

नुसते पाणीच पाणी…

पाणीच पाणी

फेसबुक पोस्टची हौस, लाइव्हचे रेकॉर्ड ब्रेक

गोदावरीसह नासर्डी आणि वालदेवी अशा सर्वच नद्यांवरील पुलांसह नदीकाठावर सकाळपासूनच हौशी नाशिककरांची फोटो काढण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. विशेष म्हणजे हे फोटो काढण्यासाठी जेवढा उत्साह दिसत होता, तितकीच अगतिकता हे फोटो फेसबुकवर पोस्ट करण्यात दिसत होती. जीव धोक्यात घालून सर्वाधिक फेसबुक लाइव्हचे रेकॉर्डदेखील या पुरामुळे झाल्याचे दिसून आले. पुलाचे कठडे, इमारतींचे टेरेस, पुराचे पाणी लागलेल्या पायर्‍या, लहान पुलांवर उभे राहून हे ’उद्योग’ सुरू होते. मात्र, सकाळी साडेअकरा वाजेनंतर पूर पातळी वाढू लागल्यानंतर सुरक्षिततेसाठी पोहोचलेल्या पोलिसांनी बहुतांश ठिकाणच्या हौशी मोबाइलधारकांना हुसकावून लावले.

पूर, मिसळ अन् ‘वीकेण्ड सेलिब्रेशन’

पूर पाहण्यासाठी नाशिककरांची सर्वच भागांत गर्दी उसळली होती. सोमेश्वर, आनंदवली-चांदशी पूल, बापू पूल, फॉरेस्ट नर्सरी पूल, घारपुरे घाटावरील पूल, अहिल्याबाई होळकर पूल, तसेच आनंदवली ते फॉरेस्ट नर्सरी पूल आणि रामवाडी ते दसक अशा सर्वच नदीकाठाकडे जाणार्‍या भागांत नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती. पूराचा आनंद घेतल्यानंतर मिसळ पार्टी करण्याचा जणू ट्रेंडच दिसून आला.

१० वर्षांपूर्वीच्या महापूराची आठवण

नाशिकमध्ये २००८ सालात आलेल्या महापूराची आठवण रविवारी नाशिककरांना झाली. १० वर्षांपूर्वीच्या महापूराने नदीकाठची अतिक्रमणे, रेड लाइनमध्ये झालेली बांधकामे आणि महापालिकेचा संशयास्पद कारभार चव्हा्टयावर आला होता. गेल्या महापूराचा फटका सहन केलेल्यांच्या म्हणण्यानुसार यंदा तितकी तीव्रता नसली तरीही, बांधकामे आणि रेड, ब्ल्यू लाइन्सचा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

स्वयंपाकासह संसारावर पाणी

गंगापूररोडवरील निर्मला कॉन्व्हेंटसमोरील नदीकाठच्या भागातील महापालिकेच्या उद्यानात राहणार्‍या एका वॉचमनचा सर्व संसार पाण्याखाली गेला. या घरातील महिला स्वयंपाक करत असताना घराबाहेर गोदावरीची पातळी वाढल्याचे तिच्या लक्षातच आले नाही. वॉचमन घराकडे परतला तेव्हा घराबाहेर कमरेएवढे पाणी होते. घरातील सदस्यांना बाहेर काढण्याएवढाच वेळ त्यांना मिळाला. त्यामुळे घरातील सर्व सामान त्यांच्या डोळ्यांसमोर बघता बघता पाण्याखाली गेले.

अग्निशमन दलाचे ’रेस्क्यू ऑपरेशन’

आनंदवली ते रामवाडी या भागातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या अनेक रहिवाशांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरक्षितपणे बाहेर काढले. फॉरेस्ट नर्सरीनजीक रामजानकीसह अन्य दोन इमारतींमधील रहिवाशांची जवानांनी सुटका केली. तर, गेल्या वेळचा अनुभव लक्षात घेता विश्वास लॉन्स ते फॉरेस्ट नर्सरीदरम्यान राहणार्‍या अनेकांनी शनिवारी दुपारीच आपले संसारोपयोगी साहित्य सुरक्षित स्थळी नेले.

झाडांसह जनावरांनाही गोदावरीने घेतले कवेत

आनंदवली पूल ते फॉरेस्ट नर्सरीदरम्यान पुराचा प्रवाह एवढा वेगात होता की या सखल भागातील अनेक घरांपुढील साहित्य, पत्रे, पाण्याच्या टाक्या, वेरेडियन व्हॅलीसमोरील गोदापार्कमधील झाडे, पोलदेखील गोदावरीच्या पात्राने कवेत घेतले होते. हे साहित्य वाहत जाऊन पुढे ठिकठिकाणी पुलाच्या कठड्यांना अडकल्याने लाटांचा तडाखा आणि धडकी भरवणारा आवाज येत होता.

First Published on: August 4, 2019 8:42 PM
Exit mobile version