‘बरॅको’त हुक्का सेवन करणार्‍यांना पोलिसांचा ‘दणका’

‘बरॅको’त हुक्का सेवन करणार्‍यांना पोलिसांचा ‘दणका’

सावरगाव रस्त्यावरील बरॅको हॉटेलावर नाशिक शहर गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने छापा टाकला. या छाप्यात पोलिसांना प्रतिबंधित हुक्का विक्री करण्यासाठी ग्राहकांना विशेष जागा उपलब्ध करुन दिल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी हॉटेलमधील १० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. विशेष म्हणजे, हुक्कासंदर्भातील कारवाईत केवळ विक्रेत्यांवर गुन्हे केले जातात. त्यामुळे सेवन करणार्‍यांची ‘मौज’ कायम राहते. नाशिक पोलीस आयुक्तालयाने कठोर भूमिका घेत सर्वांवर गुन्हे नोंदविल्याने या प्रकाराला चाप बसण्याची शक्यता आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अकरा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयित वेटर राहुल रमेश साळवे (वय २१), मॅनेजर प्रशांत देवेंद्र खिल्लर (३०) यांच्यासह हुक्का सेवन करणारे संशयित साहिल जिभाऊ सोनवणे (२४), प्रतिक रमेश आहेर (२५), आशितोष राजेश पगारे (२७), शुभम सुनिल पवार (२४), विशाल रमेश देशपांडे (४०), विशाल विजय व्हिजन (४२), निखील सुभाष पाटील (३९), संदिप दिनेश खंडेलवाल (४२) व पुरुषोत्तम ईश्वरदास उबराणी (४०) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अंमली पदार्थांसंदर्भात कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार गुन्हे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी अवैधरित्या हुक्का विक्री करणार्‍यांचा शोध घेण्याची सूचना केली. विशेष पथकाचे अंमलदार बाळासाहेब नांद्रे यांना मिळालेल्या माहितीनुसार, वरिष्ठ निरीक्षक जयराम पायगुडे यांनी सापळा रचण्यास सांगितले. सहायक निरीक्षक हेमंत नागरे, उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड, सहायक उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, अंमलदार गणेश भामरे, चंद्रकांत बागडे, अनिरुद्ध येवले यांनी ही कारवाई केली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात संशयितांविरुद्ध सिगारेट व तंबाखू उत्पादने अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास गंगापूर पोलीस करीत आहेत.

First Published on: April 22, 2024 4:42 PM
Exit mobile version