नाशिक मधील किती मनसे कार्यकर्त्यांना अटक; किती मस्जिदींना भोंग्यांची परवानगी ?

नाशिक मधील किती मनसे कार्यकर्त्यांना अटक; किती मस्जिदींना भोंग्यांची परवानगी ?

नाशिक : शहरात आज पहाटे २९ पदाधिकरी कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. यात पाच महिलांचा समावेश आहे तर दोन ठिकाणी स्पीकर जप्त करण्यात आले. शहरात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला असून सर्व मशिदींच्या परिसरात तपासणी करण्यात येत आहे. शंभराहून अधिक कार्यकर्त्यांना पोलिस अधिनियम १४९ च्या नोटिस तसेच १६ जणांना कलम १४४ नुसार तडीपारीच्या नोटिस बजावल्याने पोलिस सतर्क झाले.

आजपर्यंत मशिदी, मंदिराकडून परवानगीसाठी ६० अर्ज आले आहेत. या अर्जाची छाननी करण्यात आली. त्यात ३९ अर्ज पहाटे ५ वाजेपासून अजानची परवानगी मागितल्याने बाद करण्यात आले. तर काहींचे बांधकाम महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी नसल्याने या त्रुटींची पुर्तता करण्यास सांगण्यात आले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील मशिदींवर असलेले अनाधिकृत भोंगे उतविण्या संदर्भात दिलेल्या अल्टीमेटम आज संपत असल्याने नाशिक शहर व ग्रामीण पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडणारी नाही याची पोलीस यंत्रणेकडून पुरेपुर काळजी घेतली जात असून त्यादृष्टीने शहर व जिल्ह्यात पोलीसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते यांना नोटीसा देखील बजाविण्यात आल्या आहे.

या पार्श्‍वभूमीवर शहर पोलिस आयुक्तालयाकडून शहरात ३ हजार पोलिसांचा फौजफाटा लावण्यात आला आहे. यासह राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या देखील शहरात तैनात करण्यात आल्या आहे. गृहरक्षक दलाचे ६०० जवान शहरात पोलिसांच्या मदतीसाठी बंदोबस्तात लावण्यात आलेले आहे.

जिल्ह्यातही चोख बंदोबस्त

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर जिल्ह्यात देखील शांतता रहावी म्हणून नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस दलाकडून संपूर्ण जिल्ह्यात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यासाठी ३ हजार पोलीसांचा फौजफाटा, राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या आणि गृहरक्षक दलाचे १ हजार १०० जवान बंदोबस्त ठेवणार आहे. शहर पोलिसांप्रमाणे जिल्ह्यातून १५० हून अधिक मनसे पदाधिकारी यांना ग्रामीण पोलीसांकडून नोटीस बजाविण्यात आल्या आहे.

 

कुणीही कायदा हातात घेऊ नये. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल : जयंत नाईकनवरे, पोलिस आयुक्त, नाशिक

First Published on: May 4, 2022 4:32 PM
Exit mobile version