‘त्यांच्या’ प्रेमविवाहामुळे न्यायालयात राडा

‘त्यांच्या’ प्रेमविवाहामुळे न्यायालयात राडा

प्रातिनिधीक फोटो

जळगाव मेहरुण परिसरातील मौलाना आझादनगरमध्ये राहणारे तरुण व तरुणी लग्न करून न्यायालयात दाखल झाले. ही बाब मुलीच्या कुटुंबियांना कळताच त्यांनी न्यायालयात गोंधळ घातल्याने न्यायालय परिसरात तणाव निर्माण झाला होता. यामुळे न्यायालयात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. दोघांच्या नातेवाईकांनी न्यायालयात गर्दी केल्याने चक्क तासभर दरवाजा बंद करून न्यायालयाचे कामकाज चालले. त्यानंतर एमआयडीसी पोलीस निरीक्षकांना न्यायालयात बोलवून दोघांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

सदर तरुण व तरुणीमध्ये ४ ते ५ वर्षापासून प्रेमसंबंध होते. त्यानंतर त्यांनी पळून जावून विवाह करण्याचा निर्णय घेतला. त्यानुषंगाने २८ मार्चला दोघांनी मुंबईतील भिवंडी येथे लग्न केले. मुलगी बेपत्ता झाल्याने तिच्या कुटुंबियांनी शोध घेवून एमआयडीसी पोलिसांत हरविल्याची नोंद करण्यात आली. दरम्यान, मुलीच्या कुटुंबियांना परिसरातील एक मुलगा देखील बेपत्ता झाल्याचे समजल्याने त्यांच्या घरी जावून दोनदा जाब विचारला. यानंतर तरुणाच्या कुटुंबियांनी देखील एमआयडीसी पोलिसात हरवल्याची तक्रार दाखल केली. मुलीला डांबून ठेवले असल्याचा तक्रार अर्ज न्यायालयात मुलीच्या आईने दाखल केला. यानुषंगाने न्यायालयाने पोलिसांना मुलीला हजर करण्याचे आदेश दिले. मुंबई येथून लग्न करून आल्यानंतर नवदाम्पत्यांनी वकीलाचा सल्ला घेतला. त्यानंतर सोमवारी दुपारी वाजेच्या सुमारास नवदाम्पत्य हे न्यायालयात हजर झाले. याचवेळी मुलीचे कुटुंबिय देखील न्यायालयात आल्याने त्यांनी मुलीला ओढून नेण्याचा प्रयत्न केला. याचवेळी साक्षीसाठी आलेले एमआयडीसी पोलीस स्टेशनचे कर्मचारी रामकृष्ण पाटील यांनी याठिकाणी धाव घेवून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला.

First Published on: April 10, 2019 11:53 PM
Exit mobile version