मुख्यमंत्रीपद दिल्यास काँग्रेससोबत जाणार – बहुजन वंचित आघाडी

मुख्यमंत्रीपद दिल्यास काँग्रेससोबत जाणार – बहुजन वंचित आघाडी

प्रातिंनिधिक फोटो

आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडे १४४ जागांची मागणी केली आहे. तसेच, अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून जाहीर करावे, अशी आमची मागणी आहे. याबाबत चर्चा सुरू असली तरी पक्षाने राज्यातील सर्वच्या सर्व जागांवर तयारी केल्याचे वंचित बहुजन आघाडीचे पार्लमेंटरी बोर्डाचे सदस्य अ‍ॅड. अण्णाराव पाटील यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. यावेळी त्यांच्यासमवेत बोर्डाच्या सदस्या रेखा ठाकूर उपस्थित होत्या.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभेच्या २८८ जागांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. विदर्भ, मराठवाडयातील मुलाखती झाल्या आहेत. आज नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्याचे अ‍ॅड. पाटील यांनी सांगितले. आघाडीकडून निवडणूक लढण्यासाठी इतर सर्व पक्षांतील नेते, कार्यकर्ते इच्छुक आहेत. काही माजी मंत्री, माजी आमदार, खासदारांनी मुलाखती दिल्या आहेत; पण काहींनी आताच नावे जाहीर न करण्याची विनंती केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाणार का, असे विचारले असता ते म्हणाले, काँग्रेससोबत आमचे नेते प्रकाश आंबेडकर यांची चर्चा सुरू आहे. आम्ही १४४ जागांचा प्रस्ताव दिला आहे. तसेच, आंबेडकरांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावे असा आमचा प्रस्ताव आहे. राष्ट्रवादीकडून मात्र चर्चेचा प्रस्ताव आलेला नाही. एमआयएम आणि वंचित आघाडीत मतभेद निर्माण झाल्याचे बोलले जात असल्याच्या आरोपांचे त्यांनी खंडन केले. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. एमआयएम आणि आमच्यात अद्याप जागेचा फॉर्म्युला ठरायचा आहे. तो एक स्वतंत्र पक्ष आहे. त्यामुळे तेही इच्छुकांच्या मुलाखती घेतील. लवकरच अ‍ॅड. आंबेडकर हैदराबाद येथे एमआयएम नेेते ओवेसींची भेट घेणार आहेत. नाशिकमधून सर्वच जागांवर इच्छुक मोठ्या प्रमाणावर आहेत. मात्र, उमेदवारी देताना त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी, शिक्षण, सामाजिक, राजकीय कार्य, संबधितांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत का असे विचार केले जातील, असेही त्यांनी सांगितले.
संघाच्या कार्यकर्त्याने मागितली उमेदवारी

विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून लढण्यास सत्ताधारी भाजप व शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसमधील काही माजी आमदार, जिल्हा परिषदेचे सदस्य, नगरसेवक इच्छुक असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, यात विशेष म्हणजे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समीर कुलकर्णी यांनी उमेदवारी मागितली असल्याची माहिती अ‍ॅड. आण्णाराव पाटील यांनी दिली.

कवाडेंनी प्रस्ताव द्यावा

रिपब्लिकन बहुजन मोर्चाचे निमंत्रक प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी रिपब्लिकनच्या छोट्या घटकांना आंबेडकर आघाडीत सामावून घेत नसल्याचा आरोप केला. मात्र, कवाडेंकडून याबाबत कोणताही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. त्यामुळे कोणतीही चर्चा न करता आरोप करणे चुकीचे आहे. कवाडेंनी प्रस्ताव दिल्यास निश्चितपणे त्याचा विचार करू, असेही पाटील यांनी सांगितले.

First Published on: August 24, 2019 8:24 PM
Exit mobile version