शरद पवारांना बाह्यशक्ती म्हणता मग खा. भामरे कसे चालतात : अ‍ॅड. ठाकरे

शरद पवारांना बाह्यशक्ती म्हणता मग खा. भामरे कसे चालतात : अ‍ॅड. ठाकरे

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून विद्यमान सरचिटणीस यांनी कधी नव्हे इतक्या वेळेस बाह्यशक्ती या शब्दाचा वारंवार उल्लेख केला. आता नीलिमा पवार या शरद पवारांना बाह्यशक्ती म्हणून संबोधत असल्याचे कळल्यानंतर मूळ धुळ्याचे असलेले खासदार सुभाष भामरे हे व्यासपीठावर कसे चालतात, असा थेट प्रश्न परिवर्तन पॅनेलचे नेते अ‍ॅड.नितीन ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

सभासदांच्या मेळाव्यात ठाकरे म्हणाले की, डॉ.वसंत पवार असताना त्यांनी कधीच शरद पवारांची आणि सत्यशोधक विचारसरणीची साथ सोडली नाही. परंतु, त्यांच्या पश्चात नीलिमा पवार यांनी स्वतः सिध्द राहण्यासाठी ठिकठिकाणी सोयीचे राजकारण केले. ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रीद वाक्य त्यांनी पूर्ण विरून टाकले असून ‘स्व: सुखाय स्व: हिताय’ हेच गेल्या पाच वर्षात प्रत्येक सभासदास अनुभवायला मिळाले आहे. प्रत्येक ठिकाणी सभासदांना वेठीस धरायचे आणि निवडणुकीत पुतणा मावशीचे प्रेम दाखवत विकत घेण्याची भाषा करायची हे त्यांचे गणित असल्याचा आरोपही त्यांनी केला.

माणिकराव कोकाटे यांनी मविप्रला के. के. वाघ संस्था करण्याचा डाव आखला जातोय, असे म्हणत शून्य हक्कदार असलेल्यांना यंदा धडा शिकवा असे आवाहन केले. बाळासाहेब क्षीरसागर यांनी विद्यमान सभापती माणिकराव बोरस्ते यांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. कर्मवीरांचे वारस असलेल्या तात्यांना आज निर्णय घेण्याची परवानगी नाही. केवळ संस्थेने वाहन, चालक व इतर सुविधा दिल्यामुळे त्यात ते खुश असल्याचे त्यांनी सांगितले. परिवर्तन पॅनलचा निफाड तालुक्यात गुरुवारी कोकणगाव, साकोरे मिग, पिंपळगाव बसवंत, शिरवाडे वणी, पालखेड, रानवड, सारोळे, वनसगाव, उगाव येथे प्रचार सभा झाल्या.

First Published on: August 26, 2022 6:23 PM
Exit mobile version