मुंबईतील फिल्मसिटीमध्ये ,चित्रपट आणि नाटकांना उद्योगाचा दर्जा मिळायला हवा

मुंबईतील फिल्मसिटीमध्ये ,चित्रपट आणि नाटकांना उद्योगाचा दर्जा मिळायला हवा

नाशिक : नाटकांच्या शीर्षकांवरुन समाजात काय चालले आहे ते समजते. चित्रपट आणि नाटकांना उद्योगाचा दर्जा मिळाला पाहिजे. शासनाने पाठबळ दिल्यास नाटक व चित्रपटांना उद्योगाचा दर्जा मिळेल. त्यामुळे नवोदितांना या क्षेत्रात करिअर करता येईल. राज्यातील गुणवंत कलावंतांसाठी मुंबईतील फिल्मसिटीमध्ये कार्यशाळा आयोजित करण्याचा मानस आहे, असे मत सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केले.

राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे ६० व्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेस सोमवार (दि.२१)पासून सुरुवात झाली. स्पर्धेचे उद्घाटन १९ केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. त्यावेळी ते मुंबईतून ऑनलाईन बोलत होते. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, संचालक बिभीषण चवरे आदी उपस्थित होते.अमित देशमुख पुढे म्हणाले, भारतात सहा दशके अखंड सुरु असलेली हौशी राज्य नाट्य स्पर्धा एकमेव महाराष्ट्रात आहे. कोरोनामुळे गतवर्षी नाट्य स्पर्धा झाली नाही. यंदा कोरोना संसर्ग कमी झाल्याने ५० टक्के रसिकांच्या उपस्थित राज्य नाट्य स्पर्धा होत आहेत. राज्य नाट्य स्पर्धेतून अनेक दिग्गज कलावंत तयार झाले आहेत.

मंत्री थोरात म्हणाले, राज्य स्पर्धेने महाराष्ट्रात प्रबोधन केले आहे. नाट्यस्पर्धेमुळे शहर व ग्रामीण दरी आणि स्त्री व पुरुष भेदभाव कमी झाला आहे. महाराष्ट्रात समाजसुधारक, संत आणि राज्यघटनेने जो विचार दिला आहे, तो नाटकातून द्यावा. राज्य नाट्य स्पर्धेचा पुढील वर्षी नाट्यमहोत्सव झाला पाहिजे. राज्य नाट्य स्पर्धेतून मनोरंजनासोबत ज्ञान दिले जात आहे. नाटकांमधून चुका व अन्यायावर प्रहार केला जातो.

महाशून्य नाटकातून मनोरंजन अन् प्रबोधन

हौशी राज्य नाट्य स्पर्धेंतर्गत नाशिक केंद्रावर सोमवारी पहिल्या दिवशी अमृततुल्य जीवन बहुउद्देशीय संस्थेतर्फे महाशून्य हे दोनअंकी नाटक सादर करण्यात आले. आयुष्यात माणसाला सर्वकाही मिळावे, असे वाटत असते. त्यासाठी माणूस आयुष्यभर धडपड करत असतो. त्यासाठी तो निसर्गावर प्रहार करतो. जेव्हा निसर्गाविरोधात काम करतो तेव्हा माणूस अस्वस्थ होतो. त्यातून मार्ग काढण्यासाठी अहंकार, संशय, घमेंड दूर करण्याचा प्रयत्न महाशून्य नाटकातून दाखवण्यात आला आहे. दिग्दर्शन जयप्रकाश पुरोहित यांनी केले.

First Published on: February 22, 2022 8:10 AM
Exit mobile version