शुल्क भरले नाही तर इयत्ता नववीत नापास!

शुल्क भरले नाही तर इयत्ता नववीत नापास!

नाशिक : कोरोनाकाळात शैक्षणिक शुल्क भरण्यास विलंब झालेल्या किंवा शुल्क देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता नववीत नापास करुन त्यांना पुन्हा त्याच वर्गात बसवण्याची अजब शक्कल शहरातील काही इंग्रजी माध्यम शाळांनी सुरु केली आहे. याविषयी माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.मच्छिंद्र कदम यांनी विद्यार्थ्यांना नापास न करण्याचे आदेश शाळांना दिले आहेत.शहरातील स्वयंअर्थसहाय्यीत शाळांच्या शुल्क वसुलीवरुन शाळा प्रशासन व पालकांमध्ये वाद-विवाद उद्भवल्याचे दिसून आले.

कोरोना काळात शुल्क भरले नाही म्हणून कुठल्याही विद्यार्थ्यास शिक्षणापासून वंचित ठेवू नये, असे शासनाचे आदेश आहेत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण सुरुच ठेवावे लागले. शिक्षण ऑनलाईन पूर्ण झाल्यानंतर ऑफलाईन परीक्षा घेण्यात आल्या आणि त्यात शैक्षणिक शुल्क न भरणारे विद्यार्थी नापास दाखवले जात आहेत. इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत एकाच शाळेत शिकलेला विद्यार्थी अचानकपणे नापास कसा होतो? असा प्रश्न शिक्षणाधिकार्‍यांनी उपस्थित केला आहे.

तसेच इयत्ता नववीत नापास असल्याचा दाखला देवून या विद्यार्थ्यांना शाळेबाहेरचा रस्ता दाखवला जातो. यांसह काही शैक्षणिक संस्था नापास विद्यार्थ्यांना बहिस्थ ( १७ नंबर फॉर्म प्रमाणे) विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षण घेण्याचा सल्ला देत आहेत. एकाच वर्गात दोन वेळा बसला म्हणून शाळा एका विद्यार्थ्याकडून दोन वेळा फी घेईल.

तसेच 17 नंबरचा फॉर्म भरण्यास सांगीतले जाईल. त्यानंतर शाळेतील वह्या व पुस्तके घेण्यास भाग पाडून पालकांचे आर्थिक शोषण करत आहेत. कोरोनाकाळात शासनाने विद्यार्थ्यांना वरील वर्गात प्रमोट केले तर विद्यार्थी नापास कसे होणार? बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करुन विद्यार्थी व पालकांना त्रास देणार्‍या शाळांच्या संचालक व मुख्याध्यापकांवर कारवाई करावी, असे पत्र नाशिक पॅरेटस् असोसिएशनचे अध्यक्ष नीलेश साळुंखे यांनी माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांना दिले. त्याआधारे शिक्षणाधिकार्‍यांनी शाळांना तंबी दिली आहे.

इयत्ता दहावीचा शंभर टक्के निकाल लावण्यासाठी विद्यार्थ्यांना इयत्ता नववीत नापास केले जाते. तसेच एकाच वर्गात दोनदा शुल्क आकारण्यासाठी शाळांकडून अशा पध्दतीने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान केले जात आहे.
-नीलेश साळुंखे, अध्यक्ष,
नाशिक पॅरेटस् असोसिएशन 

First Published on: March 25, 2022 9:17 AM
Exit mobile version