मतदारसंघातील कामांना स्थगिती प्रकरणी आ. खोसकर आज ग्रामविकास मंत्र्यांकडे

मतदारसंघातील कामांना स्थगिती प्रकरणी आ. खोसकर आज ग्रामविकास मंत्र्यांकडे

नाशिक : ग्रामविकास विभागाने मुलभूत सुविधांच्या कामांना स्थगिती दिल्यामुळे इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर यांची तब्बल 5 कोटी रुपयांची 54 कामे रद्द झाली आहेत. ही कामे पुनर्जिवित करण्यासाठी आमदार खोसकर बुधवार (दि.2) रोजी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना साकडे घालणार आहेत.

जिल्हा परिषदेच्या प्रशासनामुळे ही कामे रद्द झाल्याचा आरोप करत आमदार खोसकर यांनी 20 ऑक्टोबर रोजी उपोषणाचा इशारा दिला होता. त्यांची मनधरणी करत पालकमंत्री दादा भुसे यांना यश आले. परंतु, या प्रकरणाची चौकशी करुन जिल्हा परिषदेला अहवाल सादर करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने दिले होते. त्याआधारे जिल्हा परिषदेने चौकशी अहवाल तयार केला आहे. हा अहवाल घेवूनच आमदार खोसकर बुधवारी ग्रामविकास मंत्र्यांकडे जाणार आहेत.

जिल्हा परिषद प्रशासनाकडे या कामांची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केलेली असताना केवळ अधिकार्‍यांच्या वेळकाढू धोरणामुळे ही कामे रद्द झाल्याचा आरोप आमदार खोसकार यांनी केला आहे. ग्रामविकास विभागाने 12 ऑक्टोबर रोजी आदेश देत गावातील रस्ते, सभामंडप आदी मुलभूत सुविधांची कामे रद्द केली आहेत. या एका निर्णयामुळे जिल्ह्यातील जवळपास सर्वच आमदारांची कामे रद्द झाली आहेत. त्यामुळे ही कामे पुनर्जिवित करण्याचे प्रयत्न आहेत.

First Published on: November 2, 2022 12:37 PM
Exit mobile version