दोन आठवड्यांत 15 हजार राख्या गेल्या सातासमुद्रापार

दोन आठवड्यांत 15 हजार राख्या गेल्या सातासमुद्रापार

नाशिक : भावा-बहिणीच्या नात्याचे बंध सातासमुद्रापारही तितकेच अतूट असल्याने गेल्या १५ दिवसांत तब्बल १५ हजारांहून अधिक राख्या परदेशात पाठविण्यात आल्या. रक्षाबंधनानिमित्त पोस्टाने अवघ्या ३० रुपयांत परदेशी राख्या पाठविण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली होती.

शहरातील मुख्य टपाल कार्यालयाचे (जीपीओ) वरिष्ठ डाकपाल रामसिंग परदेशी व प्रवर डाक अधीक्षक प्रफुल्ल वाणी यांच्या समन्वयामुळे या सुविधेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी डॉ. संदेश बैरागी यांनी दिली. याबाबत अधिक माहिती अशी की, कोरोनाकाळात थंडावलेली पोस्टाची कामे गेल्या वर्षभरापासून वेगाने सुरू झाली आहेत. रक्षाबंधनाच्या काळात बहुतांश भगिनींनी भावाला राखी पाठवण्यासाठी पोस्टाला प्राधान्य दिले. त्यामुळे बुकिंग, वर्गीकरण व वितरणाचे काम या काळात मोठ्या प्रमाणात वाढले होते.

यासाठी अतिरिक्त मनुष्यबळही उपलब्ध करून देण्यात आले. वरिष्ठ डाकपाल रामसिंग परदेशी आणि प्रवर डाक अधीक्षक प्रफुल्ल वाणी यांनी रक्षाबंधन काळात सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत पोस्ट कार्यालय खुले ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सर्व पोस्टमन व इतर कर्मचार्‍यांनी अधिक वेळ कार्यरत राहून बहिणीचा स्नेहभाव भावापर्यंत पोहोचविण्यासाठी काम केले. पोस्टमन संघटनेचे अध्यक्ष सुभाष दराडे यांनीही सर्व सहकार्‍यांना या कामात अधिकाधिक योगदान देण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे यंदाचा रक्षाबंधनाचा सण नाशिकच्या सर्व पोस्ट कार्यालयांसाठी लाभदायी ठरल्याचे दिसून आले.

First Published on: September 1, 2023 12:39 PM
Exit mobile version