शरद पवारांनीच ‘परिवर्तना’चे दिले आदेश : पिंगळे

शरद पवारांनीच ‘परिवर्तना’चे दिले आदेश : पिंगळे

नाशिक : विद्यमान सरचिटणीस नीलिमा पवार यांनी फक्त सभासदांनाच नव्हे तर शरद पवार यांनाही फसवले आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मविप्र संस्थेत ‘परिवर्तन’ करण्याचे आदेश आम्हाला दिल्याची माहिती नाशिकचे माजी खासदार देविदास पिंगळे यांनी दिली.

परिवर्तन पॅनलचा मेळावा गुरुवारी (दि.18) नाशिकमध्ये पार पडला. यावेळी पिंगळे यांनी सत्ताधारी गटावर शरसंधान साधले. ते म्हणाले, शरद पवार यांनी अ‍ॅड. नितीन ठाकरे यांना निवडणुकीच्या पहिल्याच दिवशी शुभेच्छा दिल्या आहेत. कर्मवीर अ‍ॅड. बाबुराव ठाकरे यांचा वारसा व्यवस्थितपणे जपण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत परिवर्तन अटळ असल्याचे सांगत त्यांनी भ्रष्ट सत्ताधार्‍यांना घरी पाठवून परिवर्तन करण्याचे आवाहन केले. शिरीष कोतवाल यांनी ठाकरेंच्या रूपाने संस्थेत लोकशाही येणार असल्याचे सांगितले. मविप्र निवडणुकीत अ‍ॅड. ठाकरे यांचे परिवर्तन पॅनल निवडून येणार असून, विश्वासघात करणार्‍यांना सभासद त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे कितीही भूलथापा विरोधकांना पसरवू द्या सभासद परिवर्तन पॅनललाच कौल देतील, असा विश्वास डॉ. वसंत पवारांचे बंधू मदन पवार यांनी व्यक्त केला.

मेळाव्याचे आयोजन रमेश पिंगळे, एल. एफ. लांडगे यांनी केले होते. अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी विद्यमान सरचिटणीसांसमोर नतमस्तक होऊन पाय धरणारे कार्यकारी मंडळ सामान्य सभासदांना काय न्याय देणार, असा सवाल केला. केवळ पैशांच्या जीवावर सभासदांना विकत घेण्याची भाषा करणार्‍या सरचिटणीस व त्यांच्या कार्यकारी मंडळाला घरी बसवण्याचे आवाहन केले. माणिकराव कोकाटे यांनी अनेक मुद्यांना हात घालत आपल्या खास शैलीत सत्ताधार्‍यांवर टीका करत संस्थेतील दादागिरी संपवण्याचे आवाहन केले. बाळासाहेब क्षीरसागर यांनी निवडणुकीत निफाडची अस्मिता दाखवायची व काम कोपरगावच्या परवानगीने करायचे. त्यामुळे यांचे तालुकाप्रेम बेगडी असल्याचे सांगितले.

याप्रसंगी दशरथ हागवणे, प्रा. हरिष आडके, रवींद्र बोराडे, ताराबाई कासार, शिरीष राजे, तुकाराम बोराडे, गुलाब भामरे, गजानन भोर, प्रा. बाळासाहेब पिंगळे, नानासाहेब दाते यांनी विचार मांडले. यावेळी डी. बी. मोगल, अंबादास बनकर, संदीप गुळवे, प्रवीण जाधव, अशोक सावंत, शिवाजी गडाख, आर. के. बछाव, विश्वास मोरे, भागवत बोरस्ते, माणिक वनारसे, सिध्दार्थ वनारसे, निवृत्ती महाले, प्रभाकर माळोदे, दत्तात्रय कोशिरे, युवराज भोर, राजेंद्र ढबळे, अंकुश पिंगळे यांच्यासह हजारो सभासद उपस्थित होते.

एकहुकूमी कारभार्‍यांना घरी पाठवा : डॉ. पिंगळे

संस्थेत प्राध्यापक असलेले डॉ. अशोक पिंगळे यांनी संस्थेतील गैरकारभार पुराव्यानिशी चव्हाट्यावर आणला. गेल्या अनेक वर्षापासून संस्थेत सुरू असलेल्या बेकायदेशीर कृत्यांवर वाचा फोडली असता मला अनेक निनावी पत्रांद्वारे जिवेमारण्याची धमकी देण्यात आली. या एकहुकूमी कारभार्‍यांना घरी पाठवा, असे आवाहनही त्यांनी केले.

First Published on: August 19, 2022 3:16 PM
Exit mobile version