दिंडोरीतून जे. पी. गावितांची माघार

दिंडोरीतून जे. पी. गावितांची माघार

नाशिक । दिंडोरी लोकसभेच्या रिंगणातून जे.पी. गावित यांनी माघार घेतली आहे. यामुळे आता महायुतीच्या भारती पवार आणि महाविकास आघाडीचे भास्कर भगरे यांच्यात चुरस रंगणार हे निश्चित आहे.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे निवडणूक लढविण्यासाठी जे.पी. गावित इच्छुक होते. यासाठी त्यांनी शरद पवार यांचीही भेट घेतली. मात्र दिंडोरीत भास्कर भगरे यांना उमेदवारी दिल्याचे शरद पवारांनी सांगितल्याने जे.पी. गावित नाराज झालेे होते. त्यानंतर त्यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचे निश्चित केले होते. यासंदर्भात मुंबई येथे मार्क्सवादी पक्षाच्या राज्य कमिटीच्या झालेल्या बैठकीत दिंडोरी मतदारसंघातील साडेनऊ तालुक्यांत सर्वे करण्याचे निश्चितही झाले होते.

मात्र जे.पी. गावित यांनी पक्षीय आदेशाप्रमाणे अचानक माघार घेत आपली ताकद महाविकास आघाडीच्या उमेदवारामागे उभी करण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे आता भास्कर भगरेंचे पारडे हळूहळू जड होतांना दिसत आहे. 2004 पासून मार्क्सवादी पक्षाला सोबत घेण्यासाठी शरद पवार प्रयत्नशील होते. 2004 च्या निवडणुकीत मालेगाव मतदारसंघातून हरिभाऊ महालें राष्ट्रवादीचे उमेदवार होते, त्यावेळीही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला सोबत घेण्याचे शरद पवारांनी प्रयत्न केले होते.

मात्र जे.पी. गावितांनी वेगळी चुल मांडल्याने राष्ट्रवादीचा उमेदवार पराभूत होऊन भाजपचे हरिश्चंद्र चव्हाण निवडून आले. 2009 च्या निवडणुकतही जे.पी. गावित तिसरे उमेदवार म्हणून उभे राहिल्याने पुन्हा एकदा राष्ट्रवादीला पराभवाचा सामना करावा लागला होता.

जे.पी. गावितसोबत आल्याने महाविकास आघाडीची ताकद निश्चित वाढणार आहे. या अगोदरच्या चार पंचवार्षिकमध्ये मतांची विभागणी होत होती. मात्र आता ती टळणार असल्याने विरोधी उमेदवाराला पराभूत करणे सोपे होणार आहे. दिंडोरीतील वनहक्क जमिनींच्या प्रश्नावर जे.पी. गावितांचा अभ्यास असल्याने हा प्रश्न सोडविण्यास त्यांचे मार्गदर्शन लाभेल.
– भास्कर भगरे, लोकसभा उमेदवार, महाविकास आघाडी, दिंडोरी

First Published on: April 10, 2024 3:39 PM
Exit mobile version