जॅक्सन वधाचा आज उलगडणार पट; ‘द प्लॅन’ नाटकाचे आयोजन

जॅक्सन वधाचा आज उलगडणार पट; ‘द प्लॅन’ नाटकाचे आयोजन

प्राचीन काळापासूनच नाशिकच्या कणाकणातून क्रांतीचे तत्व घुमसते आहे. स्वधर्म स्थापनेसाठीच अयोध्येचा राजा रामचंद्र वनवास काळात या भूमीत आला. इथेच सीतामाईचे हरण झाले आणि स्वधर्म स्थापनेला निमित्त मिळाले. चहुकडे म्लेच्छांचे राज्य. स्वधर्मलोप पावला होता. अशा अंधकारमय परिस्थितीत नारायण सूर्याजीपंत ठोसर नावाचा मुलगा लग्नाच्या बोहल्यावरून सावधान एकताच पसार होतो आणि थेट प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन नाशिक भूमीत येऊन बारा वर्षे तपश्चर्या करतो. श्रीराम जय राम जय जय राम” या तारक मंत्राचा १३ कोटी जप करून स्वधर्म स्थापनेचा शंखनाद करतो.

सन १८९८ मधील तो पारतंत्र्याचा काळ. पंधरा वर्षाचा कोवळा विनायक घरातील देवीपुढे ‘शत्रूला मारिता मारिता मरे तो झुंजीन’ अशी शपथ घेतो. अभिनव भारत ही क्रांती संघटना स्थापून सशस्त्र क्रांतीचा उद्घोष करतो. बलाढ्य परकीय शक्तीला प्रचंड हादरे देणारे कार्य करतो.ते ही याच भूमीवरून. आणि अशाच भूमीत तत्कालीन औरंगाबाद (संभाजीनगर) येथून एक १९ वर्षाचा क्रांतिकारक सन १९०९ साली नाशिकला येऊन जुलमी कलेक्टर जॅक्सनची हत्या करतो आणि राष्ट्राच्या स्वातंत्र्य यज्ञात आपले बलिदान देतो. या घटना अत्यंत विलक्षण आहेत. जुलमी कलेक्टर जॅक्सनच्या निरोप समारंभ प्रसंगी नाशिकच्या विजयानंद नाट्यगृहात किर्लोस्कर कंपनीचा शारदा नावाचा नाट्यप्रयोग आयोजित करण्यात आला होता, याचवेळी सावरकरांनी पाठविलेल्या पिस्तुलामधून २१ डिसेंबर १९०९ रोजी हा वध करण्यात आला. वधानंतर अनेक क्रांतिकारकांची धरपकड करण्यात येऊन त्यांचा अतोनात छळ करण्यात आला. अनेकांच्या घरादारांची राख रांगोळी करण्यात आली आणि खटला चालविण्यात येऊन एकूण ३८ जणांवर आरोप पत्र दाखल करण्यात आले. त्यापैकी हुतात्मा कान्हेरे,कर्वे आणि देशपांडे यांना फाशीची शिक्षा देण्यात आली व वामन नारायण जोशी, शंकर रामचंद्र सोमण यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास अत्यंत स्फूर्तीदायी आहे. चैतन्यमय आहे. वीर वृत्ती जागविणारा आहे.

शस्त्राघाता शस्त्रची उत्तर असा नैसर्गिक न्याय मानणार आहे.याच न्यायाने क्रांतिकारकांनी आपल्या बलीदानाने स्वतंत्र यज्ञ सतत चेतवीत ठेवला. थोर क्रांतिकारक हुतात्मा अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे आणि नारायण देशपांडे यांना १९ एप्रिल १९१० रोजी ठाण्याच्या कारागृहात फाशी देण्यात आली होती. जुलमी जॅक्सनच्या वधा नंतर अनंत कान्हेरे यांनी अत्यंत बाणेदारपणे सांगितले की, ‘जनतेच्या न्यायालयातील नियम असा आहे की, जो हिंदी लोकांचे प्राण कवडी मोलाचे आहे असे सुचवतो त्या अपराध्याला देहांताची शिक्षा सांगितली आहे आणि ती शिक्षा देण्याचे काम माझ्या अंगावर पडल्यामुळे मी हे पवित्र कार्य केले आहे. इंग्रजांच्या जूलुमांचा सूड उगवण्यासाठी मी हे कृत्य केले आहे. मी पळून जाऊ इच्छित नाही.’नाही चिरा नाही पणती अशा या अनाम क्रांतिवीरांच्या आत्मबलिदानामुळे जे स्वातंत्र प्राप्त झाले आहे त्याविषयी आपण कृतघ्न बनायची की कृतज्ञ व्हायचे हे ठरवण्याची वेळ आली आहे. अशा अनाम क्रांतिवीरांना आदरांजली.

प्रशांत भरवीरकर
(लेखक इतिहासाचे अभ्यासक आहेत.)

First Published on: April 19, 2023 11:47 AM
Exit mobile version