भावली धरणावर कारच्या काचा फोडून दागिने, मोबाईलची चोरी

भावली धरणावर कारच्या काचा फोडून दागिने, मोबाईलची चोरी

इगतपुरी : तालुक्यातील भावली धरणाजवळ धबधब्याचा व निसर्गाचा आनंद घेण्यासाठी नाशिक येथून कुटुंबासह आलेल्या पर्यटकाच्या कारच्या काचा चोरट्यांनी फोडल्याचे समोर आले आहे. कारमधून दागिने, मोबाईल चोरी करून चोरटे पसार झाल्याची तक्रार इगतपुरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मयूर देवळे (वय ३२, रा. महालक्ष्मी अपार्टमेंट, काठे गल्ली, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मयूर व त्याची पत्नी, सासू कार (एमएच १५- डी. एस.5386)ने भावली धरणाच्या धबधबा व निसर्ग पर्यटन पहाण्यासाठी आले होते. मयूर देवळे यांनी कार भावली धरणासमोरील महामार्ग लगत पार्किंग केली. त्यावेळी कारमध्ये ६ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, १ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, तीन मोबाईल व किमती वस्तूंसह कपडे ठेवले होते. ते कारच्या काचा व दरवाजे बंद लॉक करून धबधब्याचा आनंद घेण्यासाठी गेले होते. ते परत ओले कपडे बदलण्यासाठी कारजवळ आले असता कारच्या काचा फोडून चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह मोबाईल चोरी केल्याचे निदर्शनात आले. देवळे यांनी पोलीस ठाण्यात येत फिर्याद दिली.

भावली धरण परिसरातील पार्किंग केलेल्या वाहनातून किंमती वस्तू, मोबाईल आदी वस्तू स्थानिक भुरटे चोर गाडयांच्या काचा फोडून पर्यटकांच्या मौल्यवान वस्तू चोरी करून पसार होत असल्याचा घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. याबाबत पोलीस पथकांनी तपास केला असता भुरटे चोर स्थानिक असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. भावली धरण भागात अनेक पर्यटकांच्या किंमती वस्तूसह लहान मोठया चोर्‍या झाल्या. मात्र, त्याचा अद्याप तपास लागलेला नाही, अशी खंत पर्यटकांनी व्यक्त केली. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक वसंत पथवे यांच्या मार्गदर्शनाखाली ए. एस. आय. जाधव करीत आहेत.

भावली परिसरात पर्यटकांना व पर्यटक महिलांना सुरक्षा नाही. स्थानिक युवकांकडुन लुटमार, मारहाण, शिवीगाळ करून पर्यटकांना त्रास दिला जात आहे. : कमल नाथानी, पर्यटक, मुंबई

First Published on: September 12, 2022 1:40 PM
Exit mobile version