जितेंद्र भावेंची पुन्हा आप मध्ये पक्षवापसी

जितेंद्र भावेंची पुन्हा आप मध्ये पक्षवापसी

नाशिक : महापालिकेच्या महिला अधिकार्‍याविषयी असंसदीय भाषा वापरल्याचा ठपका ठेवत आम आदमी पक्षाने राज्य समिती सदस्य तथा नाशिकचे कार्याध्यक्ष जितेंद्र भावे यांना निलंबित केले होेते. मात्र आता भावे यांची पुन्हा पक्षात वापसी झाली असून त्यांना पक्षाचे सदस्यत्व बहाल करण्यात आले आहे. याबाबतची माहिती पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी दिली.

शिक्षण अधिकारी सुनिता धनगर यांच्यासंदर्भात अयोग्य भाषा वापरल्याचा ठपका भावेंवर ठेवण्यात आला होता. या प्रकाराची चौकशी करण्यासाठी पक्षाचे राज्यातील पथक नाशिकला पाठवण्यात आले होते. या पथकाच्या चौकशीनंतर पक्षाने भावे यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वावरून निलंबित करण्यात येत असल्याचे जाहीर केले होते.

मात्र आता पक्षाने ही कारवाई मागे घेतली असून तसे पत्र राज्याचे समितीचे रंगा राचुरे, किशोर मानध्यान, विजय कुंभार, धनंजय शिंदे यांनी दिले आहे. महापौरांचा भाग असलेल्या प्रभाग क्रमांक २८ मधून भावे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. आम आदमीतील त्यांच्या पुनर्प्रवेशाने या प्रभागातील निवडणुकीला आता रंगत येणार आहे.

मी आम आदमी पार्टीचा पक्षाच्या स्थापनेपासून सक्रिय कार्यकर्ता आहे. निलंबन रद्द झाल्यामुळे माझ्या सकट राज्यातील माझे सर्व सहकारी सुखावले असून आगामी काळात व्यवस्था परिवर्तनाची लढाई अधिक जोमाने करण्याचा संकल्प करत आहोत. पक्षात मागील काही दिवसात सुद्धा रोजच उत्साहाने आणि प्रामाणिकपणे सामान्य जनतेचे जिव्हाळ्याचे प्रश्न सोडवण्याचा नित्यक्रम सुरू होता, तोच तसा पुढे अधिक ताकदीने सुरू राहील. मागील काही दिवसात मला पाठिंबा देणार्‍या आणि समर्थन करणार्‍या सर्व हितचिंतकांचे आणि सहकार्‍यांचे मी मनापासून आभार मानत आहे.    – जितेंद्र भावे

First Published on: March 4, 2022 8:25 AM
Exit mobile version