कैलास नागरी पतसंस्था गैरव्यवहार : संचालकांसह नातेवाईकांना १ कोटींची ‘खिरापत’

कैलास नागरी पतसंस्था गैरव्यवहार : संचालकांसह नातेवाईकांना १ कोटींची ‘खिरापत’

नाशिक : कैलास नागरी पतसंस्थेच्या अपहार प्रकरणी आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला असून संस्थाचालकांनी नियमबाह्य पद्धतीने संचालक आणि त्यांच्या नातेवाईकांना तब्बल एक कोटी रुपयांची खिरापत वाटल्याचे अनिल घैसास यांच्या लेखापरीक्षण अहवालात पुढे आले आहे. हे कर्ज मोठ्या प्रमाणावर थकीत असून वसुलीचा प्रश्न गंभीर बनला आहे. ही रक्कम वसूल करण्याची जबाबदारी संचालक मंडळाचे असताना वसुलीसाठी चालढकल होत असल्याचा आरोप ठेवीदारांकडून होत आहे.

कैलास नागरी सहकारी पतसंस्थेत रोज नवनवीन माहिती पुढे येत आहे. संस्थेच्या पोट नियमानुसार संस्थेचे संचालक आणि नातेवाईक यांच्या कर्जाचे प्रमाण हे एकूण कर्जाच्या ३ टक्के असणे गरजेचे आहे; मात्र लेखापरीक्षणात दिलेली आकडेवारी पाहता संस्थेचे संचालक मंडळ आणि नातलगांच्या कर्जाचे प्रमाण हे एकूण कर्जाच्या ८.९६ टक्के एवढे दिसते आहे. हे प्रमाण अत्यंत मोठे असून सर्वसामान्यांच्या पैशांची संस्थाचालकांनी मुक्तहस्ते उधळण केल्याचे दिसून येत आहे. संचालक आणि नातलकांनी घेतलेल्या कर्जामुळे संस्थेत मार्च २०१८ पर्यंत मोठी रक्कम थकीत असल्याचे दिसून येत आहे.

संस्थेचे संचालक मंडळ आणि नातलग यांच्याकडे आजही मोठ्या प्रमाणावर रक्कम थकबाकी असून वसुलीबाबत कुठलेही नियोजन दिसून येत नाही.कर्ज वसुलीसाठी संस्थाचालकांकडून चालढकल होत असल्याचे काही ठेवीदारांचे म्हणणे आहे.कर्ज वाटप करताना संस्थाचालकांनी अत्यंत बेजबाबदारपणे कर्ज वाटप केल्याचे दिसून येत आहे. बर्याच कर्ज मंजुरी पत्रांवर अध्यक्ष व व्यवस्थापकाच्या यांनी सह्याच केल्या नाही.कर्जाच्या फायलींची तपासणी केली असता वचन चिठ्ठी प्रतिज्ञापत्र व कर्जरोखे या सर्व कागदपत्रांवर संपूर्ण माहिती भरल्याचे दिसून येत नाही.कर्जदार व जामीनदाराचे उत्पन्नाचे दाखले घेण्यात आले नाही.

व्यावसायिक कर्जदाराचा व्यवसायाचा पुरावा घेण्यात आला नाही. तारण मालमत्तेची नियमित तपासणी केलेली आढळून येत नाही. काही कर्जदारांना विनाकारण व विनातारणी कर्ज वाटप केले आहे. हायरपरचेस कर्ज प्रकरणात कर्जदाराच्या सह्या बॉण्डवर घेण्यात आलेलं नाही. वाहन कर्जासाठी काही कर्जदारांकडून गाडीचे आरसी बुक घेतलेले नाही. बर्‍याच कर्ज प्रकरणात सोबत कर्जदार व जामीनदारांचे फोटो घेतलेले नाहीत. अनेक कर्ज प्रकरणात तर रहिवासी दाखले देखील जोडलेले नाहीत. अशा धक्कादायक बाबी अनिल गैसास यांच्या लेखा परीक्षणातुन समोर आले आहेत. त्यामुळे संचालक मंडळ आणि नातलगांना दिलेल्या कर्जाच्या वसुलीबाबत मोठा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.

महत्वाचा प्रश्न 

कैलास नागरी सहकारी पतसंस्थेच्या अपहार प्रकरणी लेखापरीक्षक अनिल घैसास यांनी केलेल्या सखोल लेखापरीक्षणात अनेक गंभीर बाबी समोर आलेले आहेत. त्यापैकी संचालक आणि नातलगांच्या नावे असलेल्या कर्जाची रक्कम मोठी असताना शासनाने केलेल्या लेखापरीक्षण अहवालात या कर्ज प्रकरणांचा उल्लेख नसल्याचे दिसून येत आहे. संचालक आणि नातलगांनी उचललेले कर्ज हा गंभीर मुद्दा असतानाही शासकीय लेखापरीक्षणात हा मुद्दा का टाळला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे शासकीय लेखापरीक्षणाबाबत ठेवीदारांमध्ये संशय निर्माण होत आहे.

First Published on: April 21, 2023 2:20 PM
Exit mobile version