कांदाप्रश्नी राष्ट्रवादीचा चांदवड महामार्गावर चक्काजाम; कांदा रस्त्यावर फेकून सरकारचा निषेध

कांदाप्रश्नी राष्ट्रवादीचा चांदवड महामार्गावर चक्काजाम; कांदा रस्त्यावर फेकून सरकारचा निषेध

नाशिक : या सरकारच करायचं काय? खाली डोकं वरती पाय’, केंद्र सरकार हाय हाय, कांद्याला हमीभाव मिळालाच पाहिजे, अशा घोषणा देत कांदा रस्त्यावर ओतून देत राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवडमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

गेल्या काही दिवसांपासून कांदा दरावरून नाशिकसह राज्यभरातील शेतकर्‍यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. दुसरीकडे नाफेडच्या माध्यमातून खरेदी होत नसल्याचा आरोप शेतकर्‍यांकडून केला जात आहे. अशातच विधानभवनात कांदा प्रश्नावरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. मात्र अद्यापही कांद्याबाबतची परिस्थिती जैसे थे आहे. अशातच विरोधी पक्षांकडून वारंवार आंदोलने केली जात आहे. कांदा अत्यंत कवडीमोल भावाने विकला जात असल्याने कांदा उत्पादक शेतकर्‍यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. भाजप सरकारने मुहूर्ताची वाट न पाहता तातडीने बाजार हस्तक्षेप योजना लागू करुन कांद्याला किमान अडीच हजार रुपये हमीभाव जाहीर करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुंबई आग्रा महामार्गावरील चांदवड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी अक्षरश कांदा रस्त्यावर फेकून देण्यात येऊन राज्य सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. भाजप सरकारने तातडीने बाजार हस्तक्षेप योजना लागू करुन कांद्याला किमान 2500 रुपये हमीभाव जाहीर करावा. कांद्याबरोबरच मेथी, कोथंबीर व अन्य भाजीपाल्याचेही भाव रसातळाला गेल्याच्या निषेधार्थ तसंच घरगुती गॅस दरवाढीच्या निषेधार्थ नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवड चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. कांदा प्रश्नावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. कांद्याचे दर, द्राक्षाचे पडलेले दर, वाढती महागाई या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन सुरु केले आहे.

राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर आणि समीर भुजबळ यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, माजी आमदार संजय चव्हाण, राज्य महिला आयोग सदस्या दिपीका चव्हाण, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, महिलाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव, डॅाक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.योगेश गोसावी, युवती जिल्हाध्यक्षा किशोरी खैरनार, ग्रंथालय सेलचे जिल्हाध्यक्ष विजय पवार, जेष्ठ नागरिक सेलचे जिल्हाध्यक्ष रामा पाटील, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, तालुकाध्यक्ष डॉ.सयाजीराव गायकवाड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

First Published on: March 10, 2023 7:25 PM
Exit mobile version