त्या गहाळ झालेल्या मतपत्रिकेवर अंतिमक्षणी निर्णय

त्या गहाळ झालेल्या मतपत्रिकेवर अंतिमक्षणी निर्णय

इगतपुरी तालुक्यातील मतदार संघात सरचिटणीसपदाची एक चिठ्ठी गहाळ झाल्याने परिवर्तन पॅनलचे उमेदवार संदीप गुळवे यांनी निवडणूक मंडळाच्या अध्यक्ष भास्करराव चौरे यांच्याकडे आक्षेप नोंदवला. अंतिम निकालात एक-दोन मतांचाच फरक असेल तर संबंधित गहाळ झालेल्या मतपत्रिकेवर निर्णय देण्यात येईल असे अध्यक्षांकडून सांगण्यात आले. त्यामुळे तुर्तास तणाव निवळला आहे.

इगतपुरी तालुक्यात १३८ मतदान असून त्यापैकी १३२ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. मतमोजणीपूर्वी गठ्ठे तयार करत असताना त्यामध्ये केवळ सरचिटणीस पदाचीच एक मतपत्रिका कमी असल्याचे आढळून आले. उमेदवार संदीप गुळवे यांनी निवडणूक मंडळाच्या अध्यक्षांकडे  याबाबत तक्रार केली आहे. चिठ्ठ्या सापडल्याशिवाय मतमोजणीस प्रारंभ करु नये अशी मागणी त्यांनी प्रारंभी केली होती. परंतु गहाळ झालेल्या मतपत्रिकेचा शोध घेणे सुरु आहे असे सांगत मतमोजणीची प्रक्रिया पुढे चालू ठेवण्याचे निवडणूक अध्यक्षकांनी सूचित केले. तुर्तास या मतपत्रिकेवरील निर्णयाला स्थगिती देण्यात येत असल्याचे सांगतानाच निवडणूक अटीतटीची झाल्यास या मतपत्रिकेवर निर्णय होणार आहे. दुसरी चिठ्ठी बाहेरुन आणू नका असा टोला यावेळी गुळवे यांनी लगावला. दरम्यान, अन्य मतदान पत्रिकेबाबतचाही संभ्रम मिटल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे मतमोजणीची प्रक्रिया पूर्ववत सुरु झाली आहे. दरम्यान, सरचिटणीस पदाची मतपत्रिका मतपेटीत न टाकता कुणीतरी ती बाहेर आणल्याचा संशय आहे. त्यावरुन हे ‘महाभारत’ झाल्याचे बोलले जाते.

First Published on: August 29, 2022 3:38 PM
Exit mobile version