क्रेडाई शेल्टरचा शुभारंभ; सर्वसामान्य व्यक्तींना परवडणारी घरे हवीत : मुख्यमंत्री

क्रेडाई शेल्टरचा शुभारंभ; सर्वसामान्य व्यक्तींना परवडणारी घरे हवीत : मुख्यमंत्री

नाशिक : बांधकाम व्यावसायिकांना येणार्‍या अडचणी सोडवण्यासाठी सरकार सर्वेतोपरी प्रयत्नशील आहे. परंतु, बांधकाम व्यावसायिकांनीही सर्वसामान्य व्यक्तींना परवडतील अशा घरांच्या निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा. शासनाच्या घरकूल योजनांमध्ये खासगी बांधकाम व्यावसायिकांनी सहभागी होण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

बांधकाम व्यावसायिकांची सर्वात मोठी संघटना अर्थात ‘क्रेडाई’तर्फे डोंगरे वसतिगृहावर आयोजित शेल्टर-2022 या गृहप्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवारी (दि.24) दिमाखात झाले. यावेळी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, क्रेडाई नाशिकचे अध्यक्ष रवी महाजन, राज्याचे अध्यक्ष सुनील फुरदे, राष्ट्रीय उपाध्यक्ष अनंत राजेगावकर, ललित रुंग्टा, कृणाल पाटील, सुनील कोतवाल, सुरेश पाटील, जेएलएलचे विभागीय व्यवस्थापक करण सोदी आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी ऑनलाईन संवाद साधला. ते म्हणाले, नगरविकास मंत्री असताना मी बांधकाम व्यावसायिकांना परवाना देण्यासाठी युनिफाईड डीसीपीआर ही ऑनलाईन यंत्रणा विकसित केली. त्याचा राज्यातील सर्व बांधकाम व्यावसायिकांना फायदा झाला. एखादा निर्णय घेतला की तो फक्त कागदावर न राहता, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, याद़ृष्टीने आमचे सरकार कार्यरत आहे. ‘सिडको’च्या जागा फ्री-होल्ड करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत पार्किंग, एफएसआय यांसारखे मुद्दे उपस्थित झाले होते. त्याविषयी नगरविकास विभागाचे गगरानी यांना तत्काळ लक्ष घालण्याच्या सूचना दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शहराच्या बाहेरील रिंगरोडच्या संदर्भातील सर्व अडचणी सोडवण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष सुनील फरदे, राष्ट्रीय उपाध्यक्ष अनंत राजेगावकर, क्रुणाल पाटील, करण सोदी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. क्रेडाई नाशिकचे अध्यक्ष रवी महाजन यांनी प्रास्ताविक केले. प्रदर्शनात सहभागी झालेल्या व्यक्तिंपैकी पाच लकी ड्रॉ पालकमंत्र्यांच्या हस्ते काढण्यात आले.

प्रदर्शनाची वैशिष्ठ्ये अशी 

 हैदराबाद मॉडेलचा विचार करा : पालकमंत्री

नाशिक शहराचा विकास करताना महापालिका व बांधकाम व्यावसायिकांनी हैदराबादमधील रिंगरोड मॉडेलचा विचार करण्याचे आवाहन पालकमंत्री दादा भुसे यांनी केले. कुंभमेळ्याचा विकास आराखडा तयार करताना क्रेडाई’च्या सकारात्मक सूचनांचाही विचार करण्यात येईल. त्यासाठी स्वतंत्र बैठक घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.

शेतकर्‍यांना वाढीव टीडीआर मिळावा : खा.गोडसे

रोडसाठी जमिन देणार्‍या शेतकर्‍यांना बाजार मुल्यापेक्षा कमी दर दिला जातो. त्यामुळे कुठल्याही रस्त्यासाठी शेतकर्‍यांचा विरोध होतो. त्यांना एकास पाच प्रमाणे टीडीआर मिळाल्यास त्यांना योग्य मोबदला मिळेल आणि शेतकरी जमिनही देतील, अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी दिली. विमानसेवा सुरु झाल्याने नाशिकचा विकास होत असून नाशिकहून अजून दिल्ली, पुण्याची कनेक्टिव्हीटी वाढवण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

First Published on: November 25, 2022 1:16 PM
Exit mobile version