नाशकात बिबट्याचा थरार; चौघे जखमी, तीन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर जेरबंद

नाशकात बिबट्याचा थरार; चौघे जखमी, तीन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर जेरबंद

बिबट्याने बिथरल्यानंतर थेट दिसेल त्याच्यावर हल्ला करायला सुरुवात केली.

जंगलातील भक्ष्य कमी झाल्याने शहराकडे मोर्चा वळविलेल्या बिबट्याचा गंगापूर रोडवरील सावरकर नगर परिसरात शुक्रवारी २५ जानेवारीला तब्बल तीन तास थरार बघायला मिळाला. बिबट्या सकाळी ७.३० च्या सुमारास नागरी वसाहतीत शिरला आणि भर थंडीतही परिसरातील रहिवाशांना घाम फुटला. बघ्यांच्या गर्दीमुळे बिबट्या बिथरल्याने स्वसंरक्षणार्थ त्याने नगरसेवक संतोष गायकवाड यांच्यासह चौघांवर हल्ला चढविला. सुदैवाने चौघेही या हल्ल्यातून बालंबाल बचावले. वनविभागातील कर्मचार्‍यांनी १०.३० च्या सुमारास शर्थीचे प्रयत्न करून त्याला जाळी टाकून जेरबंद केले आणि सार्‍यांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.

उच्चभ्रू लोकवस्तीचा परिसर म्हणून ओळख असलेल्या सावरकर नगर, शंकर नगर, पामस्प्रिंग कॉलनी भागात शुक्रवारी सकाळी बिबट्याने दहशत माजवली. शंकर नगर भागात बिबट्या सर्वप्रथम दिसला. तेथील मोकळ्या भूखंडातील गवताच्या आडोशाला बिबट्या लपून बसला होता. बघ्यांच्या गर्दी आणि त्यांच्या आरडाओरडमुळे बिबट्या बिथरला आणि मग त्यानं बंगल्यांच्या दिशेने धाव घेतली. १० ते १५ फुटांच्या भिंती बिबट्याने सहज लांघत बंगल्यांच्या आवारात संचार केला.

एकापाठोपाठ एकावर हल्ले

सावरकरनगरमधील मारवा बंगल्यांच्या आवारात दडून बसण्याचा प्रयत्न करत असताना बिबट्याने चार जणांवर हल्ला केला. या हल्ल्यात प्रथम वनरक्षक उत्तम पाटील जखमी झाले. त्यानंतर नगरसेवक संतोष गायकवाड यांनी काठीने बिबट्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता चवताळलेल्या बिबट्याने त्यांच्या चेहर्‍यावर पंजा मारून मारवा बंगल्यात झेप घेतली. या बंगल्यात लपण्याची जागा शोधत असताना बिबट्याने वृत्तवाहिनीचे कॅमेरामन तबरेज शेख यांच्यावर हल्ला करून जखमी केले. पत्र्यावर उभे असलेले तबरेज बिबट्यासह पंधरा फुटावरून खाली पडले. यावेळी पािेलसांनी लाठ्या मारल्याने बिबट्याने पळ काढला. त्यामुळे शेख बजावले. मात्र, त्यांचा पाय खुब्यापासून खाली निकामी झाला. त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यानंतर पत्रकार कपील भास्कर यांच्यावरही बिबट्याने हल्ला केला. भास्कर यांनी बिबट्याला तोंडावर थाप मारल्याने तो पळाला. यात भास्कर यांच्या डोक्यापासून कानापर्यंतच्या भागात ४० टाके पडले आहेत.

तीन वेळा इंजेक्शन

वनविभागाचे रेस्क्यू पथक एअर गनच्या सहाय्याने ‘ट्रॅन्क्यूलाईज’ करण्यासाठी योग्य संधी शोधत होते. याचदरम्यान बिबट्या दिसताचक्षणी पोलीस कर्मचारी त्याच्यामागे लाठ्या-काठ्या घेऊन धावत होते. यामुळे बिबट्याला ‘ट्रॅन्क्यूलाईज’ (बेशुद्ध) करताना अडचणी आल्या. वन परिमंडळ अधिकारी रवींद्र सोनार यांनी तीन वेळा इंजेक्शन सोडले असता दोन इंजेक्शन बिबट्याला सुदैवाने लागल्यामुळे त्याची आक्रमकता कमी झाली. मारवा बंगल्याच्या गेटवर लावलेल्या जाळीमध्ये बिबट्या अडकला. मात्र त्याने जोर देऊन उसळी मारल्याने वन कर्मचारी दूर फेकले गेले. सुदैवाने दुसरे पथक बिबट्यावर जाळी टाकण्यात यशस्वी झाले.

बिबट्या ही सेलिब्रेशनची गोष्ट नाही

घटनास्थळी वनविभागाचे कर्मचारी दाखल होताच नागरिकांना निघून जायला हवे. बिबट्या ही सेलिब्रेशनची गोष्ट नाही. त्यामुळे गर्दी करू नये. गर्दीवर नियंत्रण आणण्यात कर्मचार्‍यांचा अधिक वेळ जात होता.
विजय शेळके, प्रादेशिक मुख्य वन संरक्षक

First Published on: January 26, 2019 12:23 AM
Exit mobile version