नाशिककरांच्या डोक्यावर जीवघेणे संकट; धोकादायक इमारती अन् होर्डिंग्ज भयावह स्थितीत

नाशिककरांच्या डोक्यावर जीवघेणे संकट; धोकादायक इमारती अन् होर्डिंग्ज भयावह स्थितीत

नाशिक : महापालिकेकडून दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी धोकादायक वाडे आणि घरे स्वतःहून उतरवून घेण्याच्या नोटिसा देण्याचे सोपस्कार पार पाडले जातात. मात्र, शहरातील अनेक इमारती जीवघेण्या बनल्या असतानाही त्याकडे महापालिका प्रशासनासह संबंधित यंत्रणांची पूर्णपणे डोळेझाक सुरू आहे. यातील इमारतींचा काही भाग तर अक्षरशः कधीही कोसळेल असा स्थितीत आहे. दुसरीकडे नाशिककरांच्या डोक्यावर होर्डिंग्जचेही जीवघेणे संकट कायम आहे. एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी या संकटांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील या संकटांवर टाकलेला हा प्रकाशझोत..

नाशिक शहरातील अनेक वाडे जीर्ण अवस्थेत असल्याने ते कधीही कोसळण्याची शक्यता आहे. दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर महापालिकेकडून जुन्या वाड्यांना नोटिसा दिल्या जातात. जुने वाडे कोसळण्याच्या अनेक घटनांमध्ये मोठी जीवितहानीदेखील झाली आहे. यंदाही महापालिकेने शहरातील ११९२ घरांना नोटीसा दिल्या आहेत.

दुसरीकडे शहरात मध्यवर्ती भागातील व्यावसायिक इमारतीदेखील धोकादायक बनल्या आहेत. या इमारतींना बाहेरुन लावलेले फ्लेक्स, शीट, काचेच्या खिडक्या, अँगल्स धोकादायक स्थितीत असल्याने मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुण्याच्या पिंपरी चिंचवड येथे वादळी वार्‍यामुळे जाहिरात फलक कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. नाशिक शहरातही असे अनेक फलक धोकादायक स्थितीत आहेत. अशा होर्डिंग्ज आणि बंद अथवा धोकादायक अवस्थेतील इमारतींचा महापालिकेने वेळेची समन्वय साधून बंदोबस्त करावा, अन्यथा एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सुदैवाने दोघी वाचल्या

दोनच दिवसांपूर्वी नवीन पंडित कॉलनीतील एका व्यावसायिक इमारतीला बाहेरुन लावलेले ८ ते १० फूटांचे पत्र्यासारखे शीट वार्‍याने तुटून थेट रस्त्यावर पडले. त्यामुळे मोठा आवाज झाला. हे शीट पडत असतानाच बाजूने दोन महिला दुचाकीने जात होत्या. हे शीट त्यांच्यापासून अवघ्या एका फुटावर पडले. नशीब बलवत्तर म्हणून त्या वाचल्या. अन्यथा, पत्र्यासारख्या या शीटने मोठा घात केला असता. आता उर्वरित शीट कोसळण्यापूर्वीच संबंधित यंत्रणेने त्यांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.

जीव गेल्यास जबाबदारी कुणाची?

आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी प्रत्येक विभागाला वेगवेगळी जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र, घटना घडूच नये यासाठी मात्र दुर्दैवाने कोणतेही नियोजन करण्यात आलेले नाही. शहरात अशा अनेक इमारती आहेत ज्यांची अत्यंत दूरवस्था झाली आहे. काही इमारती बँकांनी सील केल्या आहेत. वर्षानुवर्षापासून इमारती विनावापरा पडून असल्याने त्यांच्यावरील काचा, पत्रे, होर्डिंग्ज, नामफलक जीर्ण होऊन धोकादायक बनले आहेत. अशा इमारतींची दखल कोण घेणार आणि त्यांची तक्रार नेमकी कोणाकडे करावी, असा प्रश्न नाशिककरांना पडला आहे.

First Published on: June 26, 2023 3:18 PM
Exit mobile version