नाशिकमध्ये भाजपसमोर महाविकास आघाडीच?

नाशिकमध्ये भाजपसमोर महाविकास आघाडीच?

नाशिकमध्ये भाजपला सत्तेवरुन पायउतार करण्यासाठी तीन सदस्यीय प्रभाग रचना विरोधकांना फलदायी ठरण्याची दाट शक्यता आहे.हीच बाब गृहीत धरुन आता महाविकास आघाडीनेच निवडणूक लढवण्याच्या हालचाली पुन्हा सुरु झाल्या आहेत. यात एका प्रभागातील प्रत्येकी एक जागा शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोडणे सुकर होणार आहे. तीन पक्षांची मते एका प्रभागात मिळाल्यास भाजपला धोबीपछाड देणे शक्य आहे,
असा अंदाज महाविकास आघाडीचे नेते लावत आहेत.

नाशिकसह राज्यातील १८ महापालिकांच्या विद्यमान पंचवार्षिकचा कार्यकाळ फेब्रुवारी २०२२ मध्ये संपुष्टात येत आहे. गेल्या निवडणुकीत भाजपने महापालिकांसाठी चार सदस्यीय प्रभागरचना तयार करून राज्यातील बहुतांश महापालिका ताब्यात घेतल्या होत्या. महानगरांमधील भाजपचे वर्चस्व संपुष्टात आणण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने डिसेंबर २०१९ मध्ये चार सदस्यांऐवजी एकसदस्यीय प्रभागरचनेचा कायदा केला होता. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने कार्यवाही सुरू केली होती. मात्र, महाविकास आघाडीत यावरून मतभेद होऊन द्विसदस्यीय किंवा त्रिसदस्यीय प्रभागरचनेच्या मागणीने जोर धरली होती. त्यानंतर शिवसेनेच्या काही मंत्र्यांकडून त्रिसदस्यीय प्रभागरचनेचा आग्रह धरला गेल्याने बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत त्रिसदस्यीय प्रभागरचनेच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे नाशकात या त्रिसदस्यीय प्रभाग रचनेनंतर तीन सदस्यांचे ४०, तर दोन सदस्यांचा एक प्रभाग निर्माण होणार आहे.

तीन सदस्यीय रचनेमागे महाविकास आघाडीचे गणित जुळवण्याच्याच हेतू असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात. एक सदस्यीय रचनेत कोणत्याही एकाच पक्षाच्या इच्छुकाला उमेदवारी मिळाली असती. त्यामुळे दोन पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते नाराज झाले असते. तसेच दोन सदस्यीय रचनेत कोणत्याही दोनच पक्षाच्या इच्छुकांना संधी मिळाली असती. त्यामुळे तिसर्‍या पक्षातील उमेदवार अन्य पक्षाची वाट धरु शकला असता. तीन सदस्यीय रचनेत मात्र तिनही पक्षाच्या उमेदवारांना सारखीच संधी मिळणार आहे.

३८ हजारांचा एक प्रभाग

शहरात १४ लाख ८६ हजार लोकसंख्या असून, त्यानुसार महापालिका हद्दीत ४१ प्रभागांमध्ये १२२ नगरसेवक असतील. त्यानुसार ३२ ते ३८ हजार लोकसंख्येचा एक प्रभाग अस्तित्वात येऊ शकेल.

First Published on: September 24, 2021 7:10 AM
Exit mobile version