लोखंडी गजाने कुत्र्याच्या पिलावर हल्ला; गुन्हा दाखल

लोखंडी गजाने कुत्र्याच्या पिलावर हल्ला; गुन्हा दाखल

पिलाला मारतानाची क्लिप व्हायरल झाली होती.

नाशिक कुत्र्याचे पिलू सोसायटीत आल्याच्या कारणावरून भरत नेरकर (रा. मखमलाबाद) यांनी पिलास चक्क लोखंडी गजाने मारहाण केली. या हल्ल्यात पिलू गंभीर जखमी झाले आहे. याप्रकरणी प्राणीप्रेमींनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी नेरकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्राणीप्रेमींनी पिलाला मारहाण करतानाचे सीसीटीव्ही फुटेजचा पुरावा पोलिसांना दिला आहे.

कॅनडा कॉर्नरवरील विसेमळा येथील शरण्या शशिकांत शेट्टी यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात संशयित नेरकरविरुद्ध तक्रार दिली आहे. त्यानुसार नेरकरविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्राण्यांवर माणसाने हल्ला करत विनाकारण त्यांना क्रूरतेने वागवणे कायद्याने गुन्हा आहे. इको-एको व शरण या संस्थांच्या पदाधिकार्‍यांना पिलावर हल्ला झाल्याची माहिती मिळाली. त्यांनी त्या पिलाची सुटका करण्यासाठी धाव घेतली. प्राणीप्रेमींनी परिसरात पिलाचा शोध घेतला मात्र, पिलू प्राणीप्रेमींना आढळून आले नाही. त्यांनी नागरिकांना पिलू दिसल्यास संपर्क साधण्याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, शरण्या शेट्टी, सुखदा गायधनी, देविका भागवत, राहूल कुलकर्णी, सागर पाटील यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन संशयित नेरकरविरूद्ध तक्रार दिली आहे.

पिलू सापडले नाही

कुत्र्याच्या पिलास मारहाण केल्याची घटना १ एप्रिलला सायंकाळी ५ ला घडली. घटनेची माहिती मिळताच इको-एको संस्थेचे सर्वजण घटनास्थळी गेलो, पण पिलू सापडले नाही. सोसायटीच्या पायरीवर पिलाचे रक्त पडल्याचे दिसून आले आहे. त्याचा आम्ही शोध घेत आहोत. याप्रकरणी संशयित नेरकरांविरूद्ध म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. – देविका भागवत, प्राणीप्रेमी

First Published on: April 5, 2019 10:09 AM
Exit mobile version