पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये मानापमान नाट्य

पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये मानापमान नाट्य

नाशिक – महापालिका निवडणुकीची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू होण्याआधीच राजकीय पक्षांमध्ये कुरबुरी सुरू झाल्या आहेत. अन्य कुठल्याही पक्षांपेक्षा सत्तेत असलेल्या पक्षांमध्ये बंडाळीची तिव्रता अधिक पहायला मिळते. त्याचाच प्रत्यय प्रभाग ९ मध्येही येत असून प्राथमिक शाळेच्या लोकार्पणानिमित्त सत्ताधारी भाजपमधील स्थानिक नगरसेवकांमध्ये मानापमान नाट्यासोबत श्रेयवादाचा संघर्षही शिगेला पेटला आहे.

प्रभाग ९ मध्ये दिनकर पाटील, वर्षा भालेराव,रविंद्र धिवरे आणि हेमलता कांडेकर हे चारही नगरसेवक महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपचे आहेत. एका पक्षात असूनही या लोकप्रतिनिधींमध्ये एकवाक्यतेचा अभाव जाणवत असल्याने सत्ता असूनही पक्षाला या प्रभागात जम बसवता आला नाही. १३ आक्टोबरला प्रभाग ९ मध्ये महापालिकेने बांधलेल्या छत्रपती शिवाजी महाराज प्राथमिक विद्यालयाचा लोकार्पण सोहळा आयोजीत करण्यात आला आहे. या सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत तीन पैकी दिनकर पाटील,रविंद्र धिवरे आणि वर्षा भालेराव या तीन नगरसेवकांचीच नावे छापण्यात आली असून हेमलता कांडेकर यांना वगळण्यात आल्याने प्रभागातील पक्ष दुही पुन्हा चर्चेत आली आहे. या संदर्भात नगरसेविका हेमलता कांडेकर या आक्रमक झाल्या आहेत. कुटुंबातील सदस्यांची नावे टाकण्याची तत्परता दाखवून लोकप्रतिनिधींना डावलण्यामागे असूया कारणीभूत असल्याचे त्यांनी सांगितले.

शाळा महापालिकेची, कार्यक्रम महापालिकेचा, पक्षाचा प्रोटोकोल, हे सारे खुंटीला टांगून कार्यक्रमाला खासगी किंवा कौटूंबिक स्वरूप देण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला आहे. पक्ष किंवा महापालिका ही कुणा एका व्यक्तीच्या किंवा कुटूंबाच्या दावणीला बांधण्याचा प्रकार सुरू राहणार असेल तर अन्य नगरसेवक किंवा कार्यकर्त्यांनी पक्षात कशासाठी रहायचे? आमची व्यथा सभागृह नेत्यांच्या कानावर घातली असून त्यांनीही वरिष्ष्ठ नेत्यांशी चर्चा केली आहे. सभागृह नेत्यांनी आमच्या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन आम्हाला न्याय देण्याचे आश्वासन दिलेले आहे. त्यामुळे त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते तसेच वरिष्ठ नेत्यांकडून न्यायाची अपेक्षा आहे. अन्यथा वेगळा पर्याय निवडावा लागेल.
हेमलता कांडेकर, नगरसेविका, प्रभाग ९

या विषयासंदर्भात पक्षाचे शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्याकडून माहिती घ्यावी. तेच सविस्तर सांगतील.
दिनकर पाटील, नगरसेवक

शाळाही महानगरपालिकेची असून त्यामध्ये सर्व सन्माननीय नगरसेवकांचे नाव टाकणे गरजेचे आहे. परंतु कोणी असा गैरप्रकार करत असेल तर तो पक्ष प्रोटोकॉल म्हणून खपवून घेतल्या जाणार नाही. संबंधित ज्यांनी कोणी हा प्रकार केला आहे त्यांनी तत्काळ यात बदल करावा अन्यथा पक्षया स्तरावर निर्णय घ्यावा लागेल. या कार्यक्रम पत्रिकेत बदल केला नाही तर सभागृह नेता म्हणून या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल आणि इतर माझ्या सभागृहातील पक्षाच्या लोकांनाही याबाबत कल्पना देईल.
कमलेश बोडके, सभागृह नेता

First Published on: November 10, 2021 3:07 PM
Exit mobile version