पावसाची कृपावृष्टी; शहरात १५० वृक्ष कोसळली, पत्रे कोसळून महिला ठार

पावसाची कृपावृष्टी; शहरात १५० वृक्ष कोसळली, पत्रे कोसळून महिला ठार

शहरात पावसाची जोरदार सलामी

सोसाट्याचा वारा, वीजांचा कडकडाट, दाटून आलेलं आभाळ आणि प्रचंड उष्मा अशा वातावरणावर गारव्याचं पांघरुन टाकत शनिवारी, ८ जूनला पावसाने शहरासह जिल्ह्यात जोरदार सलामी दिली. शहराच्या काही भागांत पावसाच्या जोरदार धारांसह गाराही कोसळल्या. दरम्यान, वेगवेगळ्या ठिकाणी सुमारे १५० हून अधिक वृक्ष उन्मळून पडल्याने अनेक वाहनांचे नुकसान झाले. तर, वडाळा परिसरात जोरदार वाऱ्यामुळे पत्रे कोसळून महिला ठार झाली.

प्रचंड वेगाने कोसळणार्‍या धारांनी शहरातील रस्ते न्हाऊन निघाले होते. दरम्यान, जिल्ह्यातील काही भागात दुसर्‍या दिवशीही वादळासह पावसाने हजेरी लावल्याने झाडे उन्मळून पडली, घरांचे छप्पर उडाले, तर काहींचा कांदा भिजून नुकसान झाले. असे असले तरी कुठेही जीवितहानी झाली नाही. दोन दिवसांपासून वातावरणात प्रचंड उकाडा निर्माण झाला होता. त्यामुळे सर्वांचे डोळे पावसाकडे लागले होते. शनिवारी सकाळपासूनच नाशिककर उकाड्याने घामाघूम झाले होते. वीज गायब झाल्याने त्यात आणखी भर पडली. शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली.

जिल्ह्याच्या काही भागात दुसर्‍या दिवशीही मुसळधार पाऊस बरसला. मनमाडमध्ये अनेक ठिकाणी झाडे कोलमडली, विजेचे खांब पडले, घरांचे छप्पर उडाली. विवेकानंद भागातील चंद्रभागा लॉन्स पडले असून मनमाडच्या भागातील काही मंगल कार्यालयांचे मोठे नुकसान झाले आहे. लासलगाव येथे 2५० टन कांदा भिजून सुमारे ५० लाखांचे नुकसान झाले आहे. निफाड तालुक्यातील उत्तर-पूर्व भागातही वादळी पाऊस झाला. तर, येवला तालुक्यातील इंदूर मार्गावरील कमान कोसळल्याने वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती.

वडाळागावात पत्रे पडून महिला ठार ३ जण जखमी 

वडाळा गावातील मेहबूब नगर परिसरात राहणाऱ्या नसीम शेख (७०) यांच्या घराचे पत्रे वादळामुळे कोसळले. त्याखाली दबून त्या जागीच ठार झाल्या. घरातील अन्य तिघे जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

वृक्ष कोसळून वाहनांचे नुकसान

नवीन नाशिक भागातील शिवनेरी उद्यानाजवळ वृक्ष कोसळून २ मारुती व्हॅन दबल्या. तर, खुटवड नगर व बारा बंगला परिसरातही अनेक ठिकाणी झाडे कोसळून वाहनांचे नुकसान झाले. पडलेली झाडे तोडून ती बाजूला करण्यासाठी अग्निशमन विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांची चांगलीच धावपळ झाली. उभ्या वाहनांवर ही झाडे कोसळ्याने सुदैवाने जिवीतहानी टळली.

First Published on: June 8, 2019 8:32 PM
Exit mobile version