रंगीबेरंगी, आकर्षक दिवे, पणत्यांनी सजली बाजारपेठ

रंगीबेरंगी, आकर्षक दिवे, पणत्यांनी सजली बाजारपेठ

नाशिक:दिव्यांचा लखलखाट, सर्वदूर पसरलेला झगमगाट.खरेदी आणि फटाक्यांची आतषबाजी… अशा दिवाळी सणाच्या उत्साहाला द्विगुणीत करणार्‍या दिव्यांसह पणत्यांची अवघी बाजारपेठ फुलली आहे. दिवाळीशी अतूट नाते असणारे हे दिवे नाशिकच्या बाजारात दाखल झाले आहेत. छोट्या पारंपरिक पणत्यांपासून हल्ली डिझायनर पणत्यांना मागणी आहे.

दिवाळीत मागणी असलेल्या या पणत्यांचे रूपडे गेल्या काही वर्षापासून बदलत चालले आहे. मात्र, पारंपरिक पणत्यांचे आकर्षण तीळमात्रही कमी झालेले नाही. चिनी मातीच्या, प्लास्टर ऑफ पॅरिस यांच्या वापरातून बनवलेल्या पणत्या बाजारात आल्या आहेत. कुयरी, चौकोनी, गोलाकार, षटकोनी, पान, मोर, हत्ती, फुलं, कमळ, तुळशी वृंदावन अशा विविध आकारांतील आकर्षक पणत्या प्रत्येकाचं लक्ष वेधून घेत आहेत.मातीच्या पणत्यांपासून तेल गळते. त्यामुळे रांगोळीच्या जवळपास, जमिनीवर तेलाचे डाग पडतात. या कारणाने प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या पणत्यांना बहुतांश व्यक्ती पसंती देत असल्याचे विक्रेते अव्विंद थावडीया यांनी सांगितले.

पणत्यांची सजावट

पणत्यांवरील आकर्षक सजावटीमुळे डिझायनर पणत्यांना यंदा अधिक मागणी आहे. मोती, खडे, रंगीबेरंगी मणी, काच, छोटेसे घुंगरू, चकाकणारी चमकी, चंदेरी सोनेरी रंगांसोबत केशरी, पोपटी, गुलाबी अशा भडक रंगांचा वापर करत दिव्यांची सजावट करण्यात कारागीर व्यस्त आहेत.

असे आहेत दर

लाल मातीचे छोटे दिवे पूर्वी पाच रूपयांना मिळत. परंतु, आता एका दिव्याची किंमत २० ते ५० रूपये झाली. रंगरंगोटी केलेले हे दिवे ३५ पासून, सजावट केलेल्या पणत्या ५० रूपयांपासून ते १५० रूपयांपर्यंत उपलब्ध आहेत. तुळशी वृंदावन आकारमानाप्रमाणे ३० रूपयांपासून विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

यंदा पारंपरिक मातीच्या पणत्यांपेक्षा डिझाईन पणत्यांना मागणी आहे. तेलाच्या मातीच्या पणत्यांमधून तेल पडत असल्याने, तसेच या पणत्यांमध्ये सारखे तेल सोडत राहावे लागते. त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या पणत्यांना अधिक मागणी असते. पारंपारिक मातीच्या पणत्यांना मागणी कमी आहे. कारागीर नसल्याने या पणत्याही बनवल्या जात नाही.
                                                                   – विकी अष्टेकर, विक्रेते

कोविडमुळे यंदा कारागीर नसल्याने पणत्यांचा माल कमी प्रमाणात येत आहे. नाशिकमध्ये राजकोट, जुनागड, अहमदाबाद, जामनगर येथून पणत्या विक्रीसाठी येत आहेत. इंधनाचे दर वाढल्याने पणत्यांच्या किंमतीतही १० ते ३० रूपयांनी वाढ झाली आहे.

                                                                                     -अरविंद थावडीया, विक्रेते

First Published on: October 21, 2021 7:30 AM
Exit mobile version