गोव्यात ठरणार नाशिक महापालिकेचा भाजपचा महापौर उमेदवार

गोव्यात ठरणार नाशिक महापालिकेचा भाजपचा महापौर उमेदवार

नाशिक महापालिका

महापौरपदासाठी भाजपमध्ये इच्छुकांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याने उमेदवारी नक्की कुणाला द्यावी? याविषयी पक्षश्रेष्ठींसमोर पेच निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या नगरसेवकांचा कोकणातील मुक्काम हलवून गोव्याला नेला आहे. या ठिकाणीच माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत नगरसेवकांशी चर्चा होऊन महापौरपद उमेदवाराचे नाव निश्चित केले जाणार आहे. दरम्यान, भाजपातील सहा नगरसेवक अद्याप संपर्कात नसून, त्यांच्याशी संपर्काचा प्रयत्न केला जात असल्याचे पक्षाकडूनच सांगण्यात आले.


हेही वाचा – ठाण्यापाठोपाठ मुंबईतही महापौरपदाची निवडणूक बिनविरोध


शिवसेनेचे नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न

२२ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक होत आहे. भाजपकडे पुरेसे संख्याबळ असले तरीही या पक्षातील नगरसेवक फोडण्यासाठी शिवसेना जीवाचे रान करत आहे. त्यामुळे भाजपने शनिवारी (दि. १६) आपल्या ४८ नगरसेवकांना सावंतवाडी येथे सहलीसाठी रवाना केले होते. मात्र, सहलीस जवळपास १७ नगरसेवकांनी दांडी मारली. यापैकी नऊ नगरसेवकांनी प्रकृती आणि खासगी महत्वाच्या कामांमुळे सहभागी होता येत नसल्याचे सांगण्यात आले. तर, पूनम धनगर, पूनम सोनवणे, मच्छिंद्र सानप, प्रियंका माने, विशाल संगमनेरे, सुमन सातभाई, सीमा ताजणे, सुनीता पिंगळे या नगरसेवकांशी संपर्कच होत नसल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले होते. यातील सीमा ताजणे आणि पूनम धनगर यांच्याशी संपर्क झाला असून, सहा नगरसेवक अद्याप संपर्काबाहेर असल्याचे सांगण्यात आले. संबंधित सहा नगरसेवकांना भ्रमणध्वनीद्वारे निरोप देण्यात आला आहे. त्यांच्या निवासस्थानी जाऊन संपर्क साधण्याचाही प्रयत्न पक्षाकडून करण्यात आला आहे. आता येत्या दोन दिवसांत पक्षाचा आदेश त्यांना देण्यात येणार आहे.

नगरसेवक गोव्याच्या दिशेला रवाना

दोन दिवसांपासून भाजप नगरसेवक सावंतवाडीला होते. सोमवारी सायंकाळी ते गोव्याच्या दिशेने रवाना झाले. या ठिकाणी माजी पालकमंत्री गिरीश महाजन तसेच उत्तर महाराष्ट्र संघटनमंत्री किशोर काळकर हे नगरसेवकांची बैठक घेतील. ही बैठक माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या आदेशान्वये होत असल्याची माहिती भाजप गटनेते जगदीश पाटील यांनी दिली. या बैठकीत महापौरपदाच्या उमेदवाराविषयी चर्चा होऊन नावावर शिक्कामोर्तब केले जाण्याची शक्यता आहे.

First Published on: November 18, 2019 9:53 PM
Exit mobile version